धक्कादायक ! फुगे विकून घरी परतणाऱ्या बापलेकीचा वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबीयांवर रविवारी काळाने घाला घातला आहे. फुगे विकून घरी परतत असताना एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बापलेकीचा मृत्यू झाला आहे. फुगे विकून झाल्यानंतर वडील, मुलगी आणि मुलीचा मामा असे तिघेजण दुचाकीवरून खुलताबादवरून औरंगाबादच्या दिशेने येत होते. त्यादरम्यान एका अज्ञात वाहनाने दौलताबाद घाटात त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेमुळे हे तिघे लांब फेकले गेले. या अपघातात 23 वर्षीय मोनिका गणेश रेनवाला हीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलीचे वडील ज्ञानेश्वर दामोदर परदेशी आणि मोनिकाचे मामा बद्री साईदास जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले.

यानंतर मोनिकाचे वडील ज्ञानेश्वर दामोदर परदेशी यांचा रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अवघ्या काही तासांत बापलेकीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर मुलीचे मामा बद्री साईदास जाधव यांच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची देखील प्रकृती चिंताजनक आहे. मृत मोनिका आपला पती आणि मुलीसह जाधववाडी येथे वास्तव्यला होती. तर मोनिकाचे वडील ज्ञानेश्वर दामोदर परदेशी हेदेखील मागच्या काही दिवसांपासून जाधववाडीतच राहत होते. फुगे विकून या सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता.अशा गरीब कुटुंबावर रविवारी काळाने घाला घातला आहे.

हा अपघात रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास झाला आहे. हा अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहन चालक जखमींना घटनास्थळी तसेच ठेवून फरार झाला आहे. यानंतर स्थानिकांनी पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला फोन केला. पण रुग्णवाहिकेला घटनास्थळी येण्यास सधारणतः 50 मिनिटे उशीर झाला. पण तोपर्यंत जखमींचे बरेच रक्त वाया गेले होते. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमींना त्वरित घाटी रुग्णालयात नेण्यात आले. याच ठिकाणी मोनिकाचे वडील ज्ञानेश्वर दामोदर परदेशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर मोनिकाचे मामा बद्री साईदास जाधव यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment