रक्ताच्या नात्याला काळिमा ! मुलगा व सुनेच्या मारहाणीत बापाचा मृत्यू

औरंगाबाद – घरगुती मालमत्तेच्या वाटणीवरून मुलगा व सुनेने कुऱ्हाडीच्या दांड्याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बापाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना पैठण तालुक्यातील बिडकीनपासून जवळ असलेल्या डोंगरू नाईक तांड्यावर मंगळवारी घडली. राजू भुरा चव्हाण असे मयताचे नाव आहे.

डोंगरू तांडा येथील राजू भुरा चव्हाण यांचे मुलगा मांगीलाल व सून कोमल यांच्यासोबत मालमत्तेच्या वाटणीवरून वाद होते. मंगळवारी त्यांच्यात जोराचे भांडण झाले. यात मुलगा मांगीलाल व त्याच्या पत्नीने राजू चव्हाण यांना कुऱ्हाडीच्या दांड्याने जबर मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या राजू चव्हाण यांना तत्काळ बिडकीन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.

प्रकृती गंभीर असल्याने तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मावळली. पोलिसांनी आरोपी मुलगा मांगीलाल व त्याची पत्नी कोमल यांना अटक केली