बापाची युक्ती अन् लेकाची मुक्ती; हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकलेल्या मुलाला वडिलांनी अशा प्रकारे काढले बाहेर

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – मागील काही काळापासून नागपूरसह देशात हॅनीट्रॅप, ब्लॅकमेलिंग, सेक्सटॉर्शनच्या अनेक घटना घडत आहेत. हे गुन्हेगार सोशल मीडियावरील भोळ्या लोकांना अलगद आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळतात. बदनामीच्या भीतीनं अनेकजण ते द्यायलादेखील तयार होतात. नागपूरात देखील हनीट्रॅपची नुकतीच एक घटना समोर आली आहे. पण या घटनेत हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या लेकाची वडिलांनी युक्तीनं सुखरूप सुटका केली आहे. तसेच आरोपीला पोलिसांच्या हवलीसुद्धा केले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?
काही दिवसांपूर्वी पीडित तरुणाला तन्वयी नावाच्या मुलीनं इन्स्टाग्रामवर फॉलो रिक्वेस्ट पाठवली होती. पीडित तरुणानं संबंधित रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर दोघांत बोलणं सुरू झालं. हळूहळू दोघांच्या गप्पा वाढू लागल्या त्यानंतर दोघांनी एकमेकांचे व्हॉट्सअ‍ॅप नंबर देखील एकमेकांना दिले. यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवरही दोघांचं बोलणं सुरू झालं. यानंतर दोघांत अश्लील विषयावर गप्पा रंगू लागल्या. दरम्यान एकेदिवशी तन्वयीनं पीडित तरुणाकडे न्यूड फोटोची मागणी केली असता मुलीच्या बोलण्याला भुलून पीडित तरुणानं आपले अश्लील फोटो संबंधित तरुणीला पाठवले आणि हिकडूनच तो हनीट्रॅपमध्ये अडकत गेला.

यानंतर काही दिवसांनी एका अज्ञात नंबरवरून पीडित तरुणाला फोन आला. तुझे काही अश्लील फोटो आमच्याकडे आहेत. तुझी बदनामी टाळायची असेल तर दीड हजार रुपये दे अशी मागणी करण्यात आली. यानंतर आरोपीच्या धमकीला घाबरून पीडित तरुणानं दीड हजार रुपये दिले. त्यानंतर आरोपीनं पुन्हा फोन करून पाच हजार रुपयांची मागणी केली. पाच हजार दिल्यानंतरही पोट नाही भरलं म्हणून आरोपीनं पुन्हा साडेसहा हजार रुपये मागितले. यावेळी देखील पीडित तरुणाने त्यांना पैसे दिले. एवढे करूनसुद्धा आरोपींची काही हाव कमी होत नव्हती. त्यांनी पुन्हा धमकी द्यायला सुरुवात केली. यावेळी पीडित तरुणानं सर्व प्रकार आपल्या वडिलांचा कानावर घातला.

यानंतर वडिलांनी मुलाला एक रुपयाही न देण्याची सुचना दिली. यानंतर आरोपीने पैसे न मिळाल्यामुळे घरी येऊन पीडित तरुणाच्या वडिलांना आणि काकांना न्यूड फोटो दाखवले. तुमचा मुलगा माझ्या नात्यातील तरुणीला त्रास देतो, असा दावा आरोपीने केला. आणि जर हे प्रकरण मिटवायचं असेल तर 50 हजार रुपये द्या अशी मागणी केली. वडिलांनीही पैसे द्यायचं मान्य केलं. यानंतर वडिलांनी आरोपीला पैसे घेऊन जाण्यासाठी एका मंगल कार्यालयात बोलवलं. तत्पूर्वी वडिलांनी याची माहिती पोलिसांना अगोदरच देऊन ठेवली होती. आरोपी तरुण पैसे घ्यायला येताच, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या आरोपीचे नाव रौनक प्रभू वैद्य असं असून तो नागपुरातील हुडकेश्वरमधील पिपळा फाटा परिसरात राहतो.

You might also like