औरंगाबाद | मुगाच्या शेंगा तोडण्यासाठी गेलेल्या शेतकरी महिलेला मोटर सायकल वरून येऊन दोघांनी चाकूचा धाक दाखवत मारहाण करत 25 ते 30 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पळवून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना वैजापूर तालुक्यातील कापूसवाडगाव शिवारात गुरुवारी दुपारी घडली. यामुळे आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आशाबाई दत्तू निगळ (वय-50) या त्यांच्या विरगाव रोडवरील शेतात गुरुवारी मुगाच्या शेंगा तोडत होत्या. दरम्यान दुपारी चार वाजेला मोटरसायकलवर दोघेजण आले. त्यातील एकाने आशाबाईकडे जाऊन गळ्यातील सोन्याचे दागिने काढून दे असे धमकावले. यामुळे घाबरलेल्या आशाबाईंनी दागिने काढून देण्यास होकार दिला.
त्याच वेळी दुसऱ्या तरुणाने आशाबाई यांना काठी आणि लाल बुक्क्यांनी मारहाण करत सोन्याचे दागिने हिसकावून तेथून पोबारा केला. मारहाणीनंतर आशा बाईचा रडण्याचा आवाज ऐकून परिसरातील महिला घटनास्थळी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर आशाबाई यांना उपचारासाठी वैजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले