जमिनीच्या वादातून हाणामारी : कराड पोलिसात परस्पर विरोधी तक्रारीत 31 जणांवर गुन्हा दाखल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील ओंड येथे जमिनीच्या वादातून दोन गटातून तुंबळ मारामारी झाली. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसात परस्पर फिर्यादी दाखल झाल्या असून दोन्हीकडील 31 जणांवर कराड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बबन बंडू थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमची अत्या मनाबाई ज्ञानू पाटील यांना घरच्या हिस्यातून तीन एक शेती दिली होती. अत्याने तीन जमीन तिचा नात जावई माणिक लालासो मोहिते (रा. रेठरे खुर्द) यास विकली. यानंतर अत्या मयत झाली. ती जमीन पडून आहे. 15 जून रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास माझा भाऊ दादासो बापूराव थोरात यांचा फोन आला. त्याने सांगितले की, आपल्या जमीन गट नं. 1018 मध्ये माणिक लालासो मोहिते व त्याच्या कुटुंबातील बरेच लोक शेतात येऊन पिकांचे नुकसान करत आहेत.
माहिती मिळताच मी, माझी पत्नी शोभा, बहिण सुवर्णा रघुनाथ शेवाळे, लता, अशाताई चव्हाण असे शेतात गेलो असता तेथे माणिक लालासो मोहिते, राजवर्धन माणिक मोहिते, संदीप महादेव देसाई, सौ. अजिता माणिक मोहिते, सुशिला आनंद पाटील, रामचंद्र ज्ञानू पाटील, गुड्डी माणिक मोहिते, वैभव चोरगे, अनिल पैलवान, संदीप परीट, ट्रॅक्टर चालक राम देसाई, गोट्या उर्फ तुषार वसंत यादव व इतर 3 ते 4 हे ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने पिकाचे नुकसान करित असल्याचे दिसले. याबाबत माणिक मोहिते यास जाब विचारायला गेलो असता ते सर्वजण मला व माझ्या कुटुबियांना मारहाण करण्यासाठी आले. मला धक्काबुकी केली. शेतातील उसाचे पीक तसेच सोयाबीन यामध्ये ट्रॅक्टर रोटर, जेसीबी फिरवून पिकाचे नुकसान केले. तसेच जनावरांच्या शेडची तोडफोड केली. याप्रकरणी वरील सर्व संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर प्रियंका माणिक मोहिते (रा. रेठरे खु., ता.कराड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बबन बंडू थोरात, सविता राजेंद्र थोरात, सुवर्णा शेवाळे, शिवबा बबन थोरात, लता मोरे, दादासोा बापूराव थोरात, अशा चव्हाण, संध्या दादासोा चव्हाण, प्रकाश भोसले, नाना थोरात, पंकज मोरे (सर्व रा.ओंड, ता.कराड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा जमाव करणे, लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

प्रियांका मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, माझ्या पतीने 2014 मध्ये हरिभाऊ रंगराव कुलकर्णी (रा.ओंड) यांची जमिन गट नं. 1018 खरेदी केली आहे. ती जमिन आम्ही वहिवाटीत असतो. परंतु गावातील बबन बंडू थोरात व त्यांचे कुटुंबिय त्या जमिनीवर हक्क सांगत आहेत. 15 जून रोजी सकाळी 11 च्या सुमारास मी माझा मुलगा राजवर्धन व घरातील सर्वजण तसेच संदीप महादेव देसाई यांच्या ट्रॅक्टरसह गट नं. 1018 मध्ये गेलो. शेतात जाऊन आम्ही मशागतीचे काम करत होतो. त्यावेळी वरील संशयितांनी तुम्ही आमच्या शेतात का आला अशी विचारणा करुन माझा मुलगा हषवर्धन यास मारहाण केली. तसेच मला धक्काबुक्की केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

You might also like