लाईट्स- कॅमेरा- ॲक्शन! गोरेगाव फिल्मसिटीत १५ जूनपासून सुरु होणार चित्रीकरण

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे चित्रीकरणाला फुल्ल स्टॉप लागला होता. यामुळे मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीतसुद्धा शुकशुकाट होता. दरम्यान अनेक मालिकांचे शुटिंग इतर राज्यांमध्ये सुरु होते. मात्र आता महाराष्ट्रात अनलॉकची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा लाईट्स- कॅमेरा आणि ॲक्शनचा आवाज घुमणार. येत्या १५ जूनपासून गोरेगाव फिल्मसिटीमध्ये चित्रीकरण करण्याची परवागणी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक महाविकास महामंडळाने दिली आहे. मात्र याकरिता काही नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असणार आहे.

 

आता लवकरच मालिकांच्या सेटवर येत्या महिन्या अखेरपर्यंत शुटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर काही दिवसांतच गोरेगाव फिल्मसिटीत सर्व चित्रिकरणाचे प्रयोग पूर्व पदावर येतील. मात्र या चित्रिकरणादरम्यान कोरोनासंबंधित सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. इतकेच नव्हे तर चित्रिकरणादरम्यान मार्गदर्शक सुचनांचे पालन होते का नाही हे पाहण्यासाठी महामंडळाने काही अधिकारी नेमले आहे. या अधिकाऱ्यांमार्फत सेटची तपासणी केली जाणार आहे.

दरम्यान शुटिंगला केवळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी राहील तर ६५ हून अधिक वयोगटातील कलाकारांना प्रवेश बंदी असेल. सध्या गोरेगाव फिल्मसिटीमध्ये अनेक मराठी मालिकांच्या सेटसह अनेक हिंदी मालिका तसेच रिऍलिटी शो आणि अनेक चित्रपटांचे सेट देखील आहेत. दरम्यान मालिका आणि चित्रपटांना याठिकाणी संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच शूटिंगसाठी परवाना देण्यात आला आहे. परंतु अनेक निर्मात्यांनी वेळेची मर्यादा वाढवून देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात येत्या काही दिवसांतच निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे.

या व्यतिरिक्त फिल्मसिटीमध्ये मालिका आणि चित्रपटांचे शुटिंग करण्यासंदर्भातील नियमावलीनुसार, जेष्ठ कलाकार अर्थात ६५ हून अधिक वयोगटातील कलाकार, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील व्यक्तींना चित्रीकरणाच्या सेटवर कोणतेही काम करता येणार नाही. तसेच सेटवर मर्यादेहून अधिक व्यक्तींना प्रवेश नसेल. फिल्मसिटीत प्रवेश करतेवेळी निर्मिती संस्थेचे अधिकृत ओळखपत्र बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा त्याचा प्रवेश नाकारला जाईल.

तसेच फिल्मसिटी व्यवस्थापन आणि निर्मिती संस्थेत समन्वयकाची नेमणूक निर्मात्याने स्वतः करावयाची आहे. चित्रीकरणाशी संबंधित कलाकारांपासून ते स्पॉटबॉयपर्यंत सर्वांना आरोग्य सेतू अॅप वापरणे बंधनकारक आहे. मुख्य नियमानुसार चित्रीकरणासाठी प्रेक्षकांना प्रवेश नसणार आहे. चित्रीकरणात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःची वैद्यकीय माहिती स्वयंघोषित करणे आवश्यक आहे. केशभूषा आणि रंगभूषा करणाऱ्या कलाकारांनी पीपीई कीटचा वापर करणे बंधनकारक असेल. वैद्यकीय वाहन आणि प्रथमोपचार सोयी या प्रत्येक सेटवर आवश्यक आहेत.

You might also like