यंदा दिवाळी फराळ महागात जाणार ! डाळीचे भाव भडकण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । अतिरिक्त व लांबलेल्या पावसाचा यंदा तूर डाळ वगळता सर्वच डाळींना फटका बसला आहे. हरभरा डाळीच्या किमती वाढत असल्याने ऐन दिवाळीत लाडू महागणार आहे. एकूणच यंदा दिवाळीचा फराळ सर्वसामान्यांसाठी महाग असेल, असे चित्र आहे. दिवाळीतील फराळ तयार करण्यासाठी प्रामुख्याने विविध डाळींचा उपयोग होतो. हरभरा डाळीच्या बेसनापासून तयार केला जाणारा लाडू खवय्यांच्या मोठ्या पसंतीचा असतो. यामुळे त्याची मागणी सर्वाधिक असते. मात्र आता बाजारात हरभरा डाळ व बेसनाच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. पण त्या तुलनेत पीक कमी असल्याने पुढील आठवडाभरात हरभरा डाळीचे भाव भडकण्याची शक्यता आहे.

दरम्यान देशात यावर्षी १०.०१ दशलक्ष टन हरभऱ्याचे उत्पादन झाले असून त्यात मागील वर्षीच्या तुलनेत १०.८५ टक्के घट झाली, असा नॅशनल बल्क होल्डिंग कॉर्पोरेशनचा अहवाल आहे. देशातील डाळीची मागणी मात्र जवळपास १२ ते १३ दशलक्ष टन आहे. त्यातच यावर्षी पीक विलंबाने घेतले जात असल्याने हरभरा डाळ व बेसनदेखील महाग होत आहे.

दरम्यान हरभरा वगळता उर्वरित सर्व डाळींचा नवीन माल दिवाळी दरम्यान बाजारात येत असतो. पण यंदा अतिरिक्त व लांबलेल्या पावसाचा डाळींना मोठा फटका बसला आहे. तुरडाळ वगळता सर्वच डाळींच्या उत्पादनात घट झाली आहे. तुरडाळीत २१ टक्के वाढीसह ४ लाख २४ हजार दशलक्ष टन उत्पादन झाले आहे. पण उडीद व मुगडाळीच्या उत्पादनात सरासरी १२ टक्के घट झाल्याचा अहवाल आहे.

Leave a Comment