“… आणि म्हणूनच वीजेची बिलं ही वाढली आहेत”-वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्यातील अंदाजे २ कोटी वीज ग्राहकांची घरगुती बिले ही ग्राहकांच्या अंदाजापेक्षा जास्त आलेली आहेत. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संभ्रम आणि असंतोष निर्माण झालेला आहे. मात्र प्रत्यक्षात या बिलवाढीची दोन प्रमुख कारणे आहेत, या कारणांसंदर्भात वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

“वीज बिल वाढण्याच पहिलं कारण जे आहे नैसर्गिक आहे. मार्च ते जून हा पूर्णपणे उन्हाळ्याचा कालावधी असतो त्यातच या काळात सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे कुटुंबातील बहुतेक जण घरातच बसून होते. त्यामुळे उन्हाळ्याच्य या काळात सर्व खोल्यांमधील दिवे, पंखे, टीव्ही, कॉम्प्युटर सुरू राहिल्याने वीजेचा वापर वाढला. दुसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे १ एप्रिल २०२० पासून वीजेची झालेली दरवाढ. १ एप्रिलनंतरचे हे पहिलेच बिल आहे आणि त्यामुळे आता आलेल्या बिलांतील अडीच महिने हे जादा वीज दराचे आहेत. वास्तविक ग्राहकांचा खरा असंतोष हा दरवाढीच्या विरोधात असायला हवा. पण हि झालेली दरवाढ माहीतीच नसल्याने बिले चुकीची आली आहेत, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण झाला आहे.” अशी माहिती वीजतज्ज्ञ व महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी गुरुवारी दिली.

घरगुती वीज ग्राहकांचे १ एप्रिलच्या आधीचे दर व १ एप्रिलपासून वाढलेले सध्याचे दर यांचे डिटेल्स पुढीलप्रमाणे आहेत. वीज बिलांतील स्थिर आकार हा पहिले दरमहा ९० रु. होता, तो आता १०० रु. झालेला आहे. त्याच्या वहनाचा आकार हा पूर्वी १.२८ रु. प्रति युनिट होता, तो आता वाढून १.४५ रु. प्रति युनिट झाला आहे. वीज आकार हा पहिल्या १०० युनिट्स साठी पूर्वी ३.०५ रु. प्रति युनिट होता, तो आता वाढून ३.४६ रु. प्रति युनिट झालेला आहे. १०० युनिट्सच्या पुढील १०१ ते ३०० युनिट्स पर्यंतचा दर हा पूर्वी ६.९५ रु. प्रति युनिट होता, तो आता वाढून ७.४३ रु. प्रति युनिट झालेला आहे. ३०० युनिट्सच्या पुढील ३०१ ते ५०० युनिट्स पर्यंतचा दर पूर्वी हा ९.९० रु. प्रति युनिट होता, तो आता वाढून १०.३२ रु प्रति युनिट झालेला आहे. स्थिर आकार, वहन आकार आणि वीजेचा आकार ही एकूण वाढ १०० युनिट्सच्या आतील ग्राहकांसाठी सरासरी १६% आहे आणि १०० युनिट्सच्या वरील ग्राहकांसाठी एकूण सरासरी दरवाढ १३ टक्के आहे. आणि या वाढीव वीज दराने ग्राहकांना पहिल्यांदाच बिले आलेली आहेत.

२२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालेला असतानाही महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ३० मार्च रोजी दरवाढीचा निर्णय जाहीर केला होता. १ एप्रिल पासून नवीन वीजदर लागू होतील असे तयावेळी जाहीर केले गेले. त्या काळात वर्तमानपत्रेही मिळत नव्हती. हा निर्णय उशीरा घेतला गेला असता किंवा लॉकडाऊन आहे म्हणून तात्पुरता स्थगित ठेवला असता तरी काही आभाळ कोसळले नसते. एवढेच नाही तर ही दरवाढ स्पष्ट दिसत असतानाही चुकीच्या वेळी वीजदर कमी केले अशी अनैतिक जाहिरातबाजीही केली. एखाद्या कोर्टाने आपल्या निकालाचे समर्थन करावे, त्यासाठी पत्रकार परिषद घेऊन व्यापक प्रसिद्धी करावी आणि वीज ग्राहकांची दिशाभूल करावी अशी घटना वीज आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे.

फेब्रुवारी २०२० चा म्हणून दाखविलेला पण चुकीचा अवास्तविक इंधन समायोजन आकार हा १.०५ रु प्रति युनिट मूळ सरासरी देयक दरात समाविष्ट केला गेला. त्यामुळे इ. स. २०१९-२० चा सरासरी देयक दर हा ६.८५ रु. प्रति युनिट ऐवजी ७.९० रु प्रति युनिट गृहीत धरला गेला आणि हा देयक दर ७.९० रु वरून वाढवून ७.३१ रु प्रति युनिट वर आणला म्हणजे दरकपात केली असे दाखविले गेले. प्रत्यक्षात सरासरी देयक दर हा ६.८५ रु प्रति युनिट वरून वाढवून ७.३१ रु प्रति युनिट याप्रमाणे वाढविण्यात आला आहे. ही दरवाढ ०.४६ रु प्रति युनिट म्हणजे सरासरी ६.७ % इतकी होती. महावितरण कंपनीनेही त्या काळात सोयीस्कररित्या मौन धरले. आता उर्जामंत्र्यांनी या बिलांतील वाढीची माहिती देताना १ एप्रिल पासून दरवाढ झाल्याचे मान्य केले आहे. तसेच ही बिले ३ हप्त्यात भरण्यास परवानगी दिली आहे. महावितरण कंपनीने आता त्यांच्या वेबसाईटवर प्रत्येक ग्राहकाच्या बिलाचा पूर्ण तपशील दिला आहे, त्यामध्ये वरीलप्रमाणे जुने आणि नवे दर स्पष्टपणे नमूद केले आहेत. ही सर्व वस्तुस्थिती समजून घेऊन वीज ग्राहकांनी दरवाढीच्या विरोधात आपला असंतोष प्रकट करणे आवश्यक आहे.

एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत महावितरण कंपनीने ऑनलाईन बिले केली आणि तीही कमी सरासरीने केली. बहुतांशी ग्राहकांनी ती पाहीलीही नाहीत आणि भरलीही नाहीत. ज्यांनी भरली आहेत, त्यांची भरलेली रक्कम वजा झालेली आहे. ज्यांनी भरली नाहीत, त्यांच्या बिलांत ती रक्कम थकबाकी म्हणून आलेली आहे. महावितरण कंपनीच्या या बिलांचा मुख्य कार्यालयाचा सॉफ्टवेअर प्रोग्राम बरोबर आहे. स्थानिक कार्यालय फक्त मीटर रीडिंगचा आकडा आणि रीडिंगची तारीख देते वा ग्राहक क्रमांकानुसार माहिती भरते. यामध्ये कांही चूक झाली, तर चुकीचे बिल येऊ शकते. अशीही कांही बिले झालेली आहेत, पण अशा बिलांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशा ग्राहकांना लेखी तक्रार करून आपली बिले दुरुस्त करून घ्यावी लागतील, अशीही माहितीही होगाडे यांनी यावेळी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment