केंद्र सरकारने काढला आदेश; हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने विक्री केल्यास एक वर्षाचा तुरुंगवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकारने हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने विकण्यावर बंदी घालली आहे. तसेच सराफा व्यापाऱ्यांना सोन्याच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य केलं आहे. यानुसार हॉलमार्क नसलेले दागिने विकल्यास एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद असणारा आदेश सरकार काढणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी सोने व्यापाऱ्यांना एक वर्षांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे १५ जानेवारी २०२१ पासून फक्त हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री करता येणार आहे. तसंच व्यापाऱ्यांना केवळ १४, १८ आणि २२ कॅरेटच्या दागिन्यांचा हॉलमार्क असलेल्या वस्तू विकता येणार आहेत. या नियमाचं उल्लंघन केल्यास एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. यासोबत दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे.

केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ पासून हॉलमार्क शिवाय सोन्याच्या दागिन्यांची विक्री होऊ शकणार नाही. सोने व्यापाऱ्यांना जुने दागिने विकण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. यादरम्यान सर्व व्यापाऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे.

हॉलमार्क बंधनकारक केल्यानंतर फसवणुकीला आळा घालण्यात मदत होईल असं रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे. अनेक सोने व्यापारी ९ कॅरेटचा दागिना विकून २२ कॅरेटचे पैसे वसूल करतात. हॉलमार्क अनिवार्य केल्यानंतर फक्त १४, १८ आणि २२ कॅरेटच्या दागिन्यांची विक्री करण्याची परवानगी मिळणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच जर कोणी सोने विक्रेता किंवा हॉलमार्क केंद्राने फसवणूक केली तर त्यांना एक लाख किंवा एकूण दागिन्यांच्या पाच पट दंड ठोठावला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

हॉलमार्किंगसाठी सरकार सर्व शहरांमध्ये हॉलमार्किंग केंद्र सुरु करण्याची तयारी करत आहे. आतापर्यंत फक्त २३४ शहरांमध्ये ही केंद्रं आहेत. लोक एक ठराविक फी भरुन दागिन्यांची तपासणी करुन घेऊ शकतात असं रामविलास पासवान यांनी सांगितलं आहे. ज्या लोकांकडे जुने दागिने आहे त्यांचं काय…त्यांनाही हॉलमार्किंग बंधनकारक असणार का ? असं विचारलं असता रामविलास पासवान यांनी सांगितलं की, हा नियम फक्त सोने व्यापाऱ्यांसाठी आहे. सामान्य नागरिक आपले दागिने हॉलमार्कच्या दागिन्यांसोबत बदलू शकतात. देशात जवळपास चार लाख सोने व्यापारी आहेत. आतापर्यंत २८ हजार ८४९ जणांनी नोंदणी केली आहे.

Leave a Comment