धक्कादायक! प्लाझ्मा थेरेपीने उपचार केलेल्या ‘त्या’ पहिल्या रुग्णाचा मृत्यू

मुंबई । कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीनं वरदान म्हणून पहिल्या जाणाऱ्या प्लाझ्मा थेरेपीवर आता प्रश्नचिन्ह तयार झालं आहे. कारण राज्यातील प्लाझ्मा थेरेपीचा पहिला प्रयोग केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्का देणारी माहिती समोर आली आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग शनिवारी लीलावती रुग्णालयातील ५२ वर्षीय रुग्णावर करण्यात आला होता. तो यशस्वी झाल्याची माहितीसुद्धा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. मात्र, या रुग्णाचा आज मृत्यू झाल्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने राज्य शासनाच्या प्रयत्नांना या रुग्णाच्या मृत्यूनंतर हादरा बसला आहे.

दरम्यान, ताप, सर्दी आणि फुप्फुसाचा संसर्ग झाल्याने या ५२ वर्षीय रुग्णाला २० एप्रिलला वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चाचण्यांमध्ये त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर या रुग्णाला व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं. त्यानंतर रुग्णालयानं पालिकेकडे त्यांच्यावर प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्याची परवानगी मागितली होती. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी हे उपचार केले जात असल्याने पालिकेने प्लाझ्मा थेरेपी देण्यास मंजुरी दिली. त्यानुसार शनिवारी नायर रुग्णालयात कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांनी दान केलेले प्लाझ्मा लीलावती रुग्णालयाला देण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी त्या रुग्णावर पहिली प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्यात आला होता. आज अखेर त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like