सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा समजल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेस आज मराठी विषयाच्या पेपरने सुरुवात झाली. बोर्डाचा पहिलाच पेपर असल्याने सकाळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ताण वाढला होता.परीक्षा केंद्रात गेल्यावर अनेक विद्यार्थी घामाघूम झाले होते, मात्र प्रश्नपत्रिका हातात पडताच, चेहऱ्यांवरील ताण कमी झाल्याचे चित्र पहायला मिळत होते.
सांगलीसह ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थी-पालकांची गर्दी झाली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी दहावीच्या बोर्ड परीक्षा १०३ केंद्रांवर सुरु झाली. जिल्ह्यातील 41 हजार 729 विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत. बोर्डाच्या पहिल्या पेपरला मराठी विषयाने झाली. दहावीची 22 मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. पहिला पेपर असल्याने सकाळपासून विद्यार्थी तणावात होते. सांगली शहरासह ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. केंद्राबाहेर विद्यार्थी एकमेकांना बेस्ट ऑफ लक देत , शुभेच्छाचा वर्षाव होत होता. त्यावेळी पालक विद्यार्थ्यांना सल्ला देत असल्याचे पहायला मिळाले.
विद्यार्थ्यांना साडेदहा वाजता शाळेच्या गेटमधून केंद्रावर प्रवेश देण्यात आला. आयुष्यात बोर्डाच्या परिक्षेला सामोरे जात असताना बहुतांशी विद्यार्थी घामाघूम झाले होते. अभ्यास केल्याप्रमाणे प्रश्न असल्याने विद्यार्थ्यांनी जोमात पेपर लिहीण्यास सुरुवात केली. परीक्षा काळातील गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभाग दक्ष झाला असून उपद्रवी व कुप्रसिध्द केंद्रांवर कडक नजर ठेवण्यात आली आहे. परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सात भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, प्राचार्य-जेष्ठ व्याख्याता तसेच विभागीय व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सात पथकांकडून परीक्षा केंद्रांना भेटी देण्यात आल्या.