सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस आणि वेगवान वारा सुरु आहे. कोंढावळे येथील कातकरी वस्तीत एका छपरात राहणाऱ्या वामन जाधव (वय- 65) यांचा अंगावर गाढ झोपेत असतानाच, मध्यरात्री छप्पर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोंढावळे येथे छपरात गाढ झोपेत असणाऱ्या वामन जाधव यांच्या अंगावर मध्यरात्रीच्या वेळी छप्पर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी वडील झोपलेले छप्पर जमीनदोस्त झाल्याचे पाहून वडिलांचा शोध मुलगा आणि सुनेने सुरू केला. वडील सापडत नसल्याने त्यांनी जमीनदोस्त झालेले छप्पर ऊचकटण्यास सुरुवात केली. त्यानंतर वामन जाधव हे त्या ठिकाणी मृत अवस्थेत सापडल्याने तेथील नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
या गरीब कातकरी समाजावर काळाने घाला घातल्याने पश्चिम भागातील गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाई तालुक्यात पावसासह वाऱ्याने पहिला बळी घेतला आहे. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट दिला असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तेव्हा जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.