मारुती-सुझुकी पाठोपाठ ‘टोयोटा’नेही परत मागवल्या आपल्या कार; हे आहे कारण

पुणे । टोयोटा किर्लोस्कर मोटरने (TKM)बुधवारी आपली प्रीमियम हॅचबॅक Glanza च्या 6 हजार 500 गाड्या परत मागवल्या आहेत. फ्युअल पंपमध्ये दोष असल्यामुळे कंपनीने या गाड्या ‘रिकॉल’ करत असल्याचं बुधवारी जाहीर केलं. विशेष म्हणजे कालच मारुती सुझूकीनेही आपल्या एकूण 1 लाख 34 हजार 885 कार परत मागवल्या आहेत. कंपनीने ‘रिकॉल’ केलेल्या सर्व वॅगनआर आणि बलेनो कार आहेत. या गाड्यांच्याही फ्युअल पंपमध्ये (fuel pump) दोष असल्यामुळे गाड्या ‘रिकॉल’ करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ‘टोयोटा’कडून रिकॉल करण्यात आलेल्या सर्व ग्लांझा कार 2 एप्रिल 2019 ते 6 ऑक्टोबर 2019 दरम्यान मॅन्युफॅक्चर झाल्या आहेत. कंपनीच्या अधिकृत डिलरशिपमध्ये तपासणी केल्यानंतर सदोष फ्युअल पंप रिप्लेस केला जाईल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. दोष असलेल्या कारमालकांशी कंपनीचे डिलर्स संपर्क करतील. तसेच, सदोष पार्टची तपासणी आणि त्याला रिप्लेस देखील डिलर्सच करतील असे कंपनीकडून सांगण्यात आले.

टोयोटाच्या या कारचं वैशिष्ट्य म्हणजे टोयोटा आणि मारुती सुझुकी यांनी संयुक्त करारानुसार निर्मिती केलेली ही पहिलीच कार आहे. मारूती सुझुकीच्या ‘बलेनो’ या लोकप्रिय मॉडेलनुसार ‘ग्लांझा’चे डिझाइन करण्यात आले आहे. यातील बहुतांश फीचर्स हे बलेनोसारखेच आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.