मुलगा होत नसल्यानं आत्महत्येस केले प्रवृत्त; पतीच्या घरासमोरच जाळला विवाहितेचा मृतदेह

जुन्नर : हॅलो महाराष्ट्र – जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात मुलगा होत नसल्याने दुसऱ्या लग्नाला परवानगी द्यावी, यासाठी एका विवाहितेला मारहाण करत तिचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. या विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नसून खून करून तिला विहिरीत टाकले असल्याचा आरोप विवाहितेच्या आई-वडिलांनी केला आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर माहेरच्या लोकांनी विवाहितेचा मृतदेह नवऱ्याच्या घरासमोरचं जाळला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण
आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव रंजना तांबे असे आहे. तिचे 15 एप्रिल 2009 रोजी नारायणगाव येथील अविनाश बंडू तांबे याच्याशी लग्न झाले होते. विवाह झाल्यानंतर तिच्या आरोपी नवऱ्याने तिला तीन वर्षे तिला चांगली वागणूक दिली. पण यानंतर त्याने मृत रंजनाला त्रास द्यायला सुरुवात केली. रंजना यांना दोन्ही मुलीच झाल्याने सासरच्यांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. एवढंच काय तर रंजना या आजारी पडल्या तरी त्यांना माहेरी पाठवले जात नव्हते.

मृत रंजना यांना नवरा, दीर, सासू आणि सासरे काम करत नाही, म्हणून वारंवार त्रास देऊन मारहाण आणि शिवीगाळ करत होते. रंजना या गरोदर असतानादेखील त्यांना अवजड कामे करायला लावत होते. त्यामुळे विवाहितेचा एकदा गर्भपातसुद्धा झाला होता. अशात रंजना यांना दोन मुली झाल्याने दोन वर्षांपूर्वी आरोपी नवऱ्याने दुसरे लग्न करायचे ठरवले होते. आरोपी नवऱ्याला मुलगा हवा असल्याने त्याने दुसऱ्या लग्नाची तयारी केली होती. परंतु रंजना यांनी नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाला विरोध केल्यामुळे तिला मारहाण करण्यात आली होती. यामुळे मानसिक दबावाखाली येऊन विवाहितेने 9 जून 2021 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह शिवहरीनगर येथील एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. यानंतर मृत रंजनाच्या माहेरच्यांनी तिचा मृतदेह नवऱ्याच्या घरासमोरच जाळला. नारायणगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

You might also like