विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस झाले ५० वर्षांचे; झुंजार आणि अभ्यासू नेतृत्वाची रंजक कहाणी

टीम हॅलो महाराष्ट्र | देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. वय ५०. महाराष्ट्राच्या राजकारणात मागील १५ वर्षांहून अधिक काळ स्वतःचं वेगळं वलय निर्माण केलेले अभ्यासू व्यक्तिमत्त्व. भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषविलेली पहिली व्यक्ती म्हणून देवेंद्र फडणवीस सर्वांना परिचयाचे आहेत. मूळच्या नागपूरच्या असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आपल्या आई – शोभाताई फडणवीस यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू मिळाले. आधी महापौर आणि नंतर सलग चौथ्यांदा आमदार असा फडणवीस यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

२०१४ साली देशभर आलेल्या मोदी लाटेने देशातील अनेक राजकीय समीकरणं बदलली. केंद्रासोबत महाराष्ट्रातही सत्ताबदल पाहायला मिळाला आणि १५ वर्षं सत्तेत असलेल्या आघाडी सरकारला खाली खेचत भाजप-सेना युतीने सरकार बनवलं. याच सरकारची धुरा देवेंद्र फडणवीस यांनी समर्थपणे सांभाळली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातील विश्वासू माणूस म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. ‘देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ ही उक्ती त्यामुळेच प्रचलित झाली. आपल्या पूर्व राजकीय अनुभवांचा पुरेपूर वापर करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा ५ वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केला.

जलयुक्त शिवार मोहीम, मराठा आरक्षण मुद्दा, भ्रष्ट नेत्यांना जागा दाखवून देण्याचा कणखरपणा, स्मार्ट सिटींची उभारणी, राज्यातील भाजपची संघटनात्मक बांधणी या फडणवीस यांच्या कार्यकाळातील जमेच्या बाजू होत्या. तर २०१९ विधानसभा निवडणुकीत नडलेला अतिआत्मविश्वास, साथीदार असलेल्या पक्षाशी बिनसलेलं धोरण, सांगली आणि कोल्हापूरमधील पूरस्थितीवेळी मदतीत केलेली दिरंगाई यामुळे फडणवीसांची दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याची महत्वकांक्षा अपुरी राहिली.

उत्तम प्रशासक नेतृत्व असतानाही बुजुर्ग नेत्यांना घरी पाठवणे, नव्या नेत्यांना जुन्यांच्या नाकावर टिच्चून पुढं आणणे, इतर पक्षातील लोक स्वतःच्या पक्षात घेऊन स्वपक्षीयांची नाराजी ओढावून घेणे, आणि विधानसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात शरद पवारांशी पंगा घेणे या गोष्टींमुळे भाजपला आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीसांना राज्याच्या सत्ता समीकरणात एक पाऊल मागे घ्यावं लागलं. राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो असं म्हणतात, त्या न्यायाने देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांशीही भल्या पहाटेच मैत्रीचा डाव रचला. मात्र अजित पवारांच्या मुरब्बी काकांनी तो डाव उधळून लावला. सध्या कोरोना संकटाच्या काळात राज्यातील विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यभर दौरे केले आहेत. निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणीही त्यांनी केली. अधून मधून केंद्रातील मोठी जबाबदारी त्यांना दिली जाईल अशा चर्चाही होतातच. एकूण काय सत्ता असो अथवा नसो देवेंद्र फडणवीस हे येत्या काही काळात महाराष्ट्रातील राजकारणात केंद्रबिंदू राहणार आहेत.

त्यांच्या अभ्यासू नेतृत्वाला अपेक्षित यश मिळो हीच त्यांच्या ५० व्या जन्मदिनी सदिच्छा..!!