औरंगाबाद : शहरातील नंदनवन कॉलनीतील रहिवासी व सध्या मिरज (सांगली) येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले डॉ. ज्ञानोबा चोहोबाजूंनी सोमवंशी (वय62) यांनी सोमवारी आजाराला कंटाळून मिरजच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत घरमालक डॉ. स्वप्निल नावे यांनी मिरज पोलिसांत फिर्याद दिली आहे.
त्यांच्या खोलीमध्ये चिठ्ठी सापडली असून त्यात त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. डॉ .ज्ञानोबा सोमवंशी हे कान-नाक-घसा तज्ज्ञ होते. यापुर्वी औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात त्यांनी 2007 ते 2010 या काळात विभागप्रमुख म्हणून काम केले होते. सध्या ते मिरजमध्ये कार्यरत होते.
काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नाशिक येथील नातेवाईकांना याची माहिती दिली आहे.शवविच्छेदनानंतर डॉ. सोमवंशी यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.