पुणे | माजी खासदार गजानन बाबर (वय-78) यांचे पिंपरी-चिंचवड येथे निधन झाले. त्यांना मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र बुधवारी दुपारी 3 वाजून 25 मिनीटांनी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी राजश्री बाबर आणि २ मुले असा परिवार आहे. निगडी येथे आज गुरूवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुळचे सातारा जिल्ह्यातील असलेल्या गजानन बाबर यांनी 1990 साली वाई मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून विधानसभा लढविली होती. त्यावेळी त्यांना मदनराव पिसाळ यांच्या विरोधात 20 हजार 417 मते मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पिंपरी – चिंचवडच्या राजकारणात स्थान निर्माण केले होते. एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी ओळख मिळवली होती. पिंपरी चिंचवडमधील काळभोरनगर येथे शिवसेनेची पहिली शाखा देखील त्यांनीच सुरु केली होती, यानंतर पिंपरीमधील पारंपरिक प्रस्थ काळभोर यांना हादरा देत बाबर यांनी पहिल्यांदा भगवा फडकवला.
भुईंज येथील किसन वीर साखर कारखान्याचे ते उपाध्यक्ष होते. मागील काही वर्षात ते साखर कारखाना सोडून इतर राजकारणापासून अलिप्त होते. किकली येथील नवभारत विकास सोसायटीचे ते सध्या अध्यक्ष होते. त्यांच्यावर निगडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गजानन बाबर हे 3 वेळा नगरसेवक, हवेली मतदार संघातून 2 वेळा आमदार झाले. मात्र 2004 मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलास लांडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. पण त्यातूनही हार न मानत 2009 ते 2014 या दरम्यान ते मावळ मतदारसंघातून शिवसेनेकडून लोकसभेवर निवडून गेले.
“किराणा दुकानात काम करणाऱ्या पोराला बाळासाहेबांनी आमदार-खासदार केले”, असे बाबर यांच्याबद्दल बोलले जायचे. मात्र 2014 साली शिवसेनेने त्यांचे तिकीट कापून श्रीरंग बारणे यांना दिले. त्यामुळे तेव्हा पासूनच ते पक्षावर नाराज होते आणि त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. मात्र तिथे फार काळ ते रमले नाहीत. महापालिका निवडणूक तोंडावर आल्यानंतरही शिवसेनेकडून विशेष जबाबदारी दिली जात नसल्यामुळे ते पक्षावर नाराज हाेते. त्यानंतर 2017 साली त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपला जवळ केले होते.