हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट विश्वाला हादरवणारी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) माजी खेळाडू शिवलिक शर्मा (Shivalik Sharma) वर फसवणूक आणि अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. शिवलिकने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप जोधपूरमधील एका मुलीने केला आहे. याबाबत पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आला आहे. शिवलिक शर्मा हा मूळचा बडोद्याचा खेळाडू आहे, मात्र आयपीएल मध्ये तो एकेकाळी मुंबई इंडिअन्सच्या संघाचा भाग होता.
सदर मुलीचा आरोप आहे की ती फेब्रुवारी २०२३ मध्ये तिच्या मैत्रिणींसोबत वडोदरा येथे गेली होती, त्याठिकाणी तिची शिवालिक शर्माशी भेट झाली. मग दोघेही मोबाईलवर बोलू लागले. दोघेही एकमेकांच्या आणखी जवळ येऊ लागले. ऑगस्ट २०२३ मध्ये, शिवालिक आणि त्याचे कुटुंब जोधपूरला आले आणि कुटुंबातील सदस्यांशी बोलल्यानंतर, शिवालिक आणि मुलीचे लग्न ठरले. दोघांनी जोधपूरमध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा सुद्धा केला.
त्यानंतर गेल्या वर्षी २७ मे रोजी शिवालिक मुलीच्या घरी गेला. त्यावेळी घरात कोणीही नव्हते. मुलीने नकार देऊनही, शिवालिकने तिला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिच्यासोबत अनेक वेळा वाईट कृत्ये करण्यात आली. शिवालिक मुलीला मेहंदीपूर बालाजी, जयपूर आणि उज्जैन येथे घेऊन गेल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये शिवलिकने लग्नाबद्दल बोलण्यासाठी मुलीला वडोदरा येथे बोलावले होते. जेव्हा मुलगी वडोदराला गेली तेव्हा शिवालिकच्या पालकांनी तिला अनेक वेळा फटकारले. तसेच साखरपुडा मोडल्याबद्दल माहिती दिली. मुलीच्या कुटुंबालाही फोनवरून याची माहिती देण्यात आली. एवढेच नाही तर मुलीला घराबाहेर हाकलून लावण्यात आले. यानंतर ती मुलगी जोधपूरला आली. मुलीने शिवालिकला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ऐकले नाही आणि तिला धमकावू लागला.
पीडितेने जोधपूरच्या कुडी भगतसुनी गृहनिर्माण मंडळ पोलिस ठाण्यात शिवालिक शर्माविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. वैद्यकीय आणि न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवण्यात आले आहेत. सध्या आरोपांची सत्यता तपासली जात आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.