Sunday, March 26, 2023

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन

- Advertisement -

नवी दिल्ली । भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीत उपचारादरम्यान त्यांचे निधन झालं आहे. दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरु होते. मेंदूत गाठ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. मुलगा अभिजीत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. अभिजीत मुखर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “जड अंतकरणाने मी आपणास सांगू इच्छितो की डॉक्टरांनी केलेले अथक प्रयत्न, देशभरातून करण्यात आलेल्या प्रार्थना यानंतरही माझे वडील प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे.”

१० ऑगस्टपासून प्रणब मुखर्जी यांची प्रकृती बिघडली होती. १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान एक दिवस आधी त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यानंतर ते कोमात गेले आहेत असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं होतं.

- Advertisement -

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करून प्रणब मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल ऐकून मन दुखावलं. त्यांचा मृत्यू एका युगाचा अंत आहे. प्रणब मुखर्जी यांचे कुटुंबीय, मित्र आणि सर्व देशवासियांबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो.”

भारतरत्न प्रणब मुखर्जी यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा संगम होता. 5 दशकांच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनात, अनेक उच्च पदांवर असूनही ते नेहमीच जमिनीशी जोडले गेले. त्यांच्या सभ्य आणि मनमिळावू स्वभावामुळे ते राजकीय क्षेत्रात लोकप्रिय होते. प्रणव मुखर्जी हे भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात ते १९६९ पासून सक्रिय होते. भारतीय राजकारणातील अमूल्य सेवेसाठी त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

प्रणव मुखर्जी यांची राजकीय कारकीर्द
भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे राजकारणात सक्रिय झाले होते. १९७३ मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते. १९८२ ते ८४ या काळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भुषवलं. १९८० ते १९८५ या कालावाधीत राज्यसभेत ते लीडर ऑफ हाऊसही होते. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी काही राजकीय कारणांमुळे त्यांना थोडंसं बाजूला करण्यात आलं. त्यामुळे त्यावेळी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस हा पक्षही त्यांनी स्थापन केला होता. मात्र १९८९ नंतर त्यांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर प्लानिंग कमिशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी हे परराष्ट्र मंत्री होते. २००४ मध्ये जेव्हा यूपीएचं सरकार आलं तेव्हाही ते मंत्रिमंडळात होते. २०१२ ते २०१७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”