माजी सैनिकांची फसवणूक ः पोलिसांच्या दुर्लक्षामुळे एसपीच्यांकडे तक्रार, लाखों रूपयांना गंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | नोकरीचे आमिष दाखवून एका भामट्याने व दोन महिलांनी प्रशिक्षणाच्या नावाखाली सातारा व पुणे जिल्ह्यातील माजी सैनिकांची, सिव्हिल गार्ड व महिलांची लाखो रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. वाईतील फसवणूक झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे समोर येत आहे.

याबाबत माजी सैनिक रवींद्र गालिदे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी निवेदनात म्हटले आहे, की राजेश रामचंद्र वैद्य (पत्ता माहीत नाही) याने वाईतील दोन महिलांना हाताशी धरून ब्येरेट सिक्युरिटी सर्व्हिसेस व फॅसिलिटी नावाची संस्था स्थापन केली. सावंत सिटी येथील एक बंगला भाड्याने घेऊन ऑफिस सुरू केले होते. या संस्थेला शिरवळ, खंडाळा येथील कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले असून त्यामध्ये दरमहा १८ ते २८ हजार रुपये अशा पगाराची नोकरी देतो, अशी जाहिरात या संस्थेने नोव्हेंबर २०२० मध्ये केली होती. त्यानुसार अनेक माजी सैनिकांनी त्यांच्याशी संपर्क साधला.

त्यावेळी प्रशिक्षण व इतर कारण देऊन सुरक्षा रक्षक पदासाठी प्रत्येकी सात हजार, सिव्हिल गार्डसाठी साडेतीन हजार व लेडीज गार्डसाठी अडीच हजार अशी रक्कम घेतली. अशाप्रकारे त्याने सुमारे चार ते पाच लाख रुपये गोळा केले. मात्र, त्यानंतर चार पाच महिने होऊनही कोणतेही काम अथवा प्रशिक्षण दिले नाही. दिलेली रक्कम मागितली तर ती देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, राजेश वैद्य अचानक गायब झाला. त्यामुळे ही संस्था बोगस असून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने वाई, सातारा, पाटण, भोर, राजापूर येथील १५ ते १६ माजी सैनिकांनी याबाबत १० फेब्रुवारी २०२१ रोजी वाई पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यामध्ये सुमारे १०० जणांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, माजी सैनिकांनी दिलेल्या तक्रारीची चौकशी सुरू असून, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे त्यास विलंब झाला. लवकरच चौकशी पूर्ण करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी सांगितले.

Leave a Comment