Wednesday, February 1, 2023

लष्करी अधिकारी असल्याचे भासवून महिलांची फसवणूक; ५ जणींशी लग्न तर वीरपत्नींना पेन्शनसाठी फसविले

- Advertisement -

बेळगाव । लष्करी अधिकारी असल्याचे भासवून महिलांची फसवणूक एका भामट्याला कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. या भामट्याने आपण लष्करात सुभेदार मेजरपदी असल्याची बतावणी करून ५ जणींशी लग्न केले आहे. यासोबतच दहापेक्षा अधिक शहिद जवानांच्या पत्नींना वन रँक पेन्शन देण्याचे सांगून पैसे उकळले आहेत. पोलीस चौकशीदरम्यान आपण अनेक तरुणांना लष्करात नोकरी लावतो म्हणून हजारो रुपये घेतल्याचे त्याने कबुल केले आहे.

या तोतया लष्करी अधिकाऱ्याचे नाव मंजुनाथ बिरादार असे असून तो विजापूर जिल्ह्यातील नालवतवाड गावातील आहे. लष्करी गणवेश परिधान करून कॅम्प परिसरात संशयास्पदरित्या वावरत असलेल्या या भामट्याला पकडून लष्कराने कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर त्याचे बिंग बाहेर पडले. लष्करी अधिकारी असल्याचे भासवून महिलांची फसवणूक करणाऱ्या या भामट्याने तब्बल ५ जणींशी लग्न केले. त्याचप्रमाणे शहिद जवानांच्या वीरपत्नींना पेन्शन मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचे चौकशीत उघडकीस आले.

- Advertisement -

या भामट्याने अनेक ठिकाणी असे उपद्व्याप केले असून एखाद्या गावात जाऊन लष्करी गणवेशात रुबाब मारून अनेक गावातील मान्यवर मंडळींची भेट घेऊन आपण अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्यावर छाप पाडली. तर कधी मी अनाथ आहे असे सांगून मला लग्न करण्याची इच्छा असल्याचे सांगायचे. अशापद्धतीने सहानुभूती मिळवून त्याच गावातील मुलीशी लग्न करून महिनाभर सासुरवाडीत पाहुणचार घ्यायचा आणि अचानक गायब व्हायचा. तर गावातील शहीद कुटुंबाचा जाहीर सत्कार करून त्यांच्याशी ओळख वाढवून वन रँक पेन्शन मिळवून देण्याचे आमिष दाखवायचे.

अशापद्धतीने त्याने जवळपास १० शहीद जवानांच्या पत्नींकडून पैसे उकळले आहेत. अनेक तरुणांना सैन्यात नोकरी मिळवून देण्याचे सांगून पैसे उकळले आहेत. सध्या कॅम्प पोलीस या तोतया लष्करी अधिकाऱ्याची कसून चौकशी करत असून हे प्रकरण त्याच्या गणवेशावरून बाहेर आल्याचे समजते आहे. गणवेश घालून कॅम्प भागात फिरताना ही बाब लक्षात आली आणि त्यानंतर कॅम्प पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतलं आहे.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in