पुणे प्रतिनिधी । राज्य शासनाने २३ ऑगस्ट रोजी केलेल्या घोषणेनुसार राज्यात ७५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांच्या मोफत एसटी बस प्रवासाला २६ ऑगस्ट २०२२ पासून प्रारंभ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्यातील ७५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळाच्या मोफत बस प्रवासाचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी एसटीने कालपासून सुरू केली असून राज्यातील ७५ वर्षावरील सर्व जेष्ठांसाठी एसटीचा प्रवास आता विनामूल्य असेल.
यासोबतच ६० वर्षावरील जेष्ठांसाठी एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमधून पूर्वीप्रमाणेच पन्नास टक्के सवलत सेवा चालू राहील असे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कळविले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयाबद्दल जेष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेवर आल्यापासून अनेक लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावलेला आहे. त्यातीलच एक महत्वाकांक्षी घोषणा म्हणून जेष्ठांसाठीच्या या मोफत एसटी प्रवास योजनेकडे पाहता येईल. मात्र या घोषणेचा एसटी महामंडळावर आर्थिक परिणाम होणार नाही याकडेही शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष द्यावं लागेल. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्यणानंतर आता हे सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडेही गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या मागण्यांवर लवकरच निर्णय घेईल अशी भावना एसटी कर्मचारीही बोलुन दाखवत आहेत.