एकनाथ खडसे लेकीसह राष्ट्रवादीत जाणार, पण खासदार सूनबाईंचं काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. खडसेंसह त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर पक्षांतर करतील. याशिवाय खडसेंच्या संपर्कातील १० ते १५ आमदार राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतील असं खात्रीलायक सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र, या सर्वात भाजपच्या तिकीटावर खासदार झालेल्या सूनबाई रक्षा खडसे (Raksha Khadse) काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. (Eknath Khadse may enter NCP with daughter MP daughter in law Raksha Khadse to stay in BJP)

एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे रावेर मतदारसंघाच्या खासदार आहेत. सलग दुसऱ्यांदा रक्षा खडसे भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात आणि भाजपमध्ये एकनाथ खडसे यांचा दबदबा पाहता रक्षा खडसे यांचा पहिला विजय हा निश्चित होता. दरम्यान, गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदाही भाजपने त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी दिली. यावेळी त्यांचा विजय झाला. खडसेंचे उत्तर महाराष्ट्रातील राजकारणातील वजन पाहता सुनबाईंच्या विजयात त्यांचा वाटा अधिक असल्याचे राजकीय पंडित सांगतात. मात्र, आता भाजपने खडसेंना अंतर दिल्याने ते नाराज होऊन राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार करणार असल्याचे निश्चित मानलं जात आहे. अशा वेळी भाजपच्या खासदार असलेल्या रक्षा खडसे यांचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.

रक्षा खडसे यांच्याकडे भाजपने महाराष्ट्र कार्यकारिणीत मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. दुसऱ्या टर्ममध्ये केवळ दीड वर्ष झाल्याने रक्षा खडसे भाजपमध्येच राहतील आणि उर्वरित ४ वर्ष पूर्ण करतील, असा अंदाज आहे. मात्र, आपले सासारे आणि ज्यांच्यामुळं राजकारणात आपली एन्ट्री झाली असे एकनाथ खडसे यांनी जर भाजप सोडली तर मग सुनबाई रक्षा खडसे यांना निर्णय घेणे कठीण होणार आहे. खडसे बापलेकीने राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरल्यास सुनबाई त्यांच्यासोबत गेल्यास त्यांना खासदारवर पाणी सोडावं लागणार आहे. त्यामुळं रक्षा खडसे एकनाथ खडसेंसोबत न जाता भाजपमध्ये राहिल्यास गृहकलहाला आमंत्रण देतील अशी मतदार संघात चर्चा आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यासह रोहिणी खडसे-खेवलकर आणि खडसेंच्या संपर्कातील १० ते १५ आमदार राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतील, असं खात्रीलायक वृत्त आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंना डावलून भाजपने त्यांच्या कन्येला तिकीट दिलं होतं. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment