“फडणवीसजी आठवतं का? आपण मोठ्या विनम्रतेने रात्रीच्या अंधारात शेकडो झाडांची कत्तल केली होती ते”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । आरेतील मेट्रो-३चे कारशेड रद्द करून ती जागा राखीव वन जाहीर करतानाच मुख्यमंत्र्यांनी कारशेड कांजूरमार्गला उभारणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयावर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. फडणवीस यांनी ठाकरे सरकारचा आरेतून कारशेड हलवण्याचा निर्णय अहंकारातून घेतल्याचे म्हटलं आहे. फडणवीसांच्या या टीकेवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी फडणवीसांना सुनावलं आहे. “रात्रीच्या अंधारात शेकडो झाडांची कत्तल ही फडणवीस सरकारने अतिशय विनम्रतेने केली होती,” असं ट्विट सावंत यांनी फडणवीसांनी केलेल्या टीकेच्या बातमीवर प्रतिक्रिया देताना केलं आहे.

उच्च न्यायलयाने आरेमधील वृक्षतोड करण्यास संमती दिल्यानंतर ४ ऑक्टोबर २०१९ च्या रात्रीच आरेमधील ४०० हून अधिक झाडे तोडण्यात आली होती. रात्री प्रशासनाने केलेल्या या कारवाईला पर्यावरण प्रेमींनी जोरदार विरोध केला होता. आरेमधील झाडे तोडत असल्याची माहितीसमोर आल्यानंतर रात्रीच अनेक पर्यावरण प्रेमी आरेतील कारशेड परिसरामध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी वृक्षतोड थांबवण्यासाठी आंदोलन केलं होतं.

हे आंदोलन मोडून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले होते. आंदोलन शांत करण्यासाठी पोलिसांनी एक-एक करून आंदोलकांना ताब्यात घेतलेलं. रात्री ३ वाजेच्या सुमारास सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर आरेमध्ये पुन्हा झाडं कापण्यात आली. यावेळी जवळपास ४०० झाडांची रात्रीत कत्तल केल्याची माहिती समोर आली होती. रात्रभर आरेमध्ये पर्यावरणप्रेमी आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष सुरु होता. यावरुन सावंत यांनी त्यावेळी सत्तेत असणाऱ्या फडणवीस यांना टोला लगावला आहे.

नेमकं फडणवीसांनी म्हटलं तरी काय होतं?
कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास ४००० कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितल्याची आठवण फडणवीस यांनी सरकारला करुन दिली आहे. फेसबुकवर सविस्तर पोस्टद्वारे फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. या संदर्भात फडणवीस यांनी सरकारपुढे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते? आणि कशासाठी? असं त्यांनी म्हटलं आहे. “कांजूरमार्गच्या जागेचा यापूर्वी सरकारने विचार केला पण त्यावर हायकोर्टाची स्थगिती होती. काही खाजगी व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला होता. स्थगिती मागे घ्यावी, म्हणून विनंती करण्यात आली त्यावर न्यायालयाने दावे पुढील काळात निकाली निघाले तर त्यासाठीची रक्कम भरण्यास सांगितले. ही रक्कम २०१५ मध्ये सुमारे २,४०० कोटी रुपयांच्या आसपास होती. आज त्या प्रकरणाची सद्यस्थिती काय? असा सवाल विचारताना हे प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले तर विलंबाला जबाबदार कोण? शिवाय कांजूरमार्गची जागा मर्सी लँड असल्याने त्याला स्थिर करण्यासाठी किमान २ वर्षांचा अवधी लागेल. याशिवाय आत्तापर्यंतच्या सर्व निविदा रद्द कराव्या लागतील आणि नव्याने संपूर्ण प्रक्रिया राबवावी लागेल. या नवीन जागेसाठी डीपीआर किंवा फिजीबिलीटी अहवाल काहीही तयार झालेला नाही”, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे जो मेट्रो प्रकल्प पुढच्यावर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता, तो आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे असंही फडणवीस म्हणाले आहेत. “आरेच्या कारशेडसाठी ४०० कोटी रुपये आधीच खर्च झालेल, स्थगितीमुळे १३०० कोटी पाण्यात गेले. शिवाय ४००० कोटींचा आर्थिक भार वाढला. कांजूरमार्ग जागेचा वाद कायम राहिल्यास २४०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सरकारी तिजोरीवर पडेल. एवढे सारे करून मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडेल. आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खिळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते? असा सवालही फडणवीस यांनी केला आहे. ही जनतेची मोठी दिशाभूल आहे,” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment