धनंजय मुंडेंनी मुंबईत अनुभवली भयंकर ‘पाऊसकोंडी’, सांगितला थरारक अनुभव..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबईत बुधवारी झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसाचा मोठा फटका राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना बसला. धनंजय मुंडे यांना तब्बल सव्वा तीन तास एका जागी अडकून पडावे लागले. मुंडे हे सकाळी साडेनऊ वाजता परळीहून मुंबईच्या दिशेने निघाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या बैठकीला त्यांना पोहोचायचं होतं. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते ईस्टर्न फ्री वेवर पोहोचले होते. मात्र, त्यानंतर त्यांना भयंकर मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा थरारक अनुभव सांगितला. ‘मागील २४ वर्षांहून अधिक काळापासून मी मुंबईत येतोय, जातोय. पण बुधवारी जी मुंबई मी पाहिली, अनुभवली ती माझ्या आधीच्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती,’ अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी यावेळी दिली.

धनंजय मुंडे म्हणाले कि, ‘संध्याकाळी ५ वाजता ईस्टर्न फ्री वेच्या पुलावर भारत पेट्रोलियमच्या रिफायनरीच्या बाजूला माझी कार अडकली. मग तब्बल सव्वा तीन तास तिथेच होतो. एक इंच गाडी मागे नाही की पुढे नाही. परळीहून निघाल्यापासून कुठेही थांबलो नव्हतो. त्यामुळं पोटात अक्षरश: कावळे ओरडत होते. मग आईनं दिलेल्या दशम्यांचे दोन घास खाल्ले. किती वेळ थांबावं लागेल असा विचार करत होतो. शेवटी पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं पुलावरच्या ५०० मीटरपर्यंच्या गाड्या बाजूला काढल्या आणि गाडी पुढं घ्यायचा प्रयत्न केला. इथे आपल्याला मदत मिळू शकणार नाही हे समजल्यानं जवळजवळ छातीएवढ्या पाण्यातून गाडी कशीबशी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकापर्यंत नेली. तिथं गाडी बंदच पडली. मग स्टेशनलाच एक-दीड तास थांबलो. मग फोनाफोनी करून तिथून पायी पायी चर्चगेट रेल्वे स्थानकापर्यंत आलो. अखेर रात्री साडेअकरा वाजता मरिन प्लाझाला पोहोचलो.’

‘पवार साहेबांच्या बैठकीला पोहोचता येणार नाही हे लक्षात आल्यानंतर मी फोटो, व्हिडिओ आमच्या नेत्यांना पाठवले. तेव्हा त्यांना वस्तुस्थिती लक्षात आली. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर मंत्री, सामान्य नागरिक, विरोधी पक्ष, हा पक्ष तो पक्ष सगळे एकसारखे असतात. सामान्यांना जो त्रास होतो, तोच मंत्र्यांना होतो,’ असं ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment