नांदेडमध्ये लोकशाहीची ऐशी-तैशी; उपसरपंचपदाचा लिलाव करत साडे १० लाखात विक्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड । नांदेडमध्ये सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. लोकशाही व्यवस्थेची ऐशी-तैशी करणारा प्रकार या व्हिडिओमध्ये घडताना दिसत आहे. नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीपुर्वी सरपंच आणि उपसरपंचपदाचा जाहीर लिलाव करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मुदखेड तालुक्यातील महाटी गावातील हा व्हिडीओ असून यात गावातील उपसरपंचपदासाठी चक्क बोली लावण्यात आली आहे.

महाटी या गावातील सरपंचपद ओबीसीसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे उपसरपंचपद आपल्या ताब्यात राहावे यासाठी काही धन दांडग्यानी ही बोली लावली आहे. त्यात उपसरपंचपदाची साडे १० लाखाला विक्री झाली आहे. गावात वीट भट्ट्या आणि रेतीचा व्यवसाय तेजीत असून त्यात रग्गड कमाई होते. त्यासाठी हा लिलाव करण्यात आला आहे. (Nanded Gram Panchayat Election auction for Up Sarpanch Post)

गावचे पुढारी निवडण्यासाठी लोकशाहीत मतदानाचा अधिकार गावकऱ्यांना असतो. मात्र गावातील इरसाल पुढारी लोकशाहीचे लोणचे बनवून तिला तोंडी लावताना दिसत आहेत. त्यातून गावातील पुढारी पदाचा थेट लिलाव केला जातं आहे. या लिलावातून आलेल्या पैशातून गावातील शाळा डिजीटल करणार असल्याचे गोंडस कारण स्थानिक सांगत आहेत. पण अशा लिलावाच्या पैशातून बनलेल्या शाळेत शिकणारे विद्यार्थी काय आदर्श घेतील याची कल्पनाही करवत नाही. त्यामुळे अशाप्रकारे लिलाव करणाऱ्यावर काय कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

महाटी गावाचे मोल
गोदावरी नदीच्या समृद्ध काठावर महाटी गाव वसलेले आहे. नांदेडपासून जवळच असलेल्या या गावाचा एकेकाळी मुख्य व्यवसाय हा शेती होता. मात्र आता या गावात गोदावरी नदीची मुबलक माती उपलब्ध असल्याने असंख्य वीटभट्ट्या तयार झाल्या आहेत. तसेच गोदावरी नदीपात्रातून रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. या दोन्ही व्यवसायातून कोट्यावधींची उलाढाल होत असल्याने गावात पैशाचे झरे वाहत आहेत. त्यातूनच गावातील पुढारीपणाचा थेट लिलाव करण्याचे धाडस या गावात झालं आहे. (Nanded Gram Panchayat Election auction for Up Sarpanch Post)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment