कराडकरांसाठी चांगली बातमी! कृष्णा हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीस मान्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनामुक्तीच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीस मान्यता मिळाली आहे. अशी मान्यता लाभलेले कृष्णा हॉस्पिटल हे सातारा जिल्ह्यातील एकमेव रूग्णालय असून, या थेरपीचा लाभ कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी अधिक लाभदायी ठरणार आहे.

कराड येथील कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाविरूद्धच्या लढाईत पूर्वीपासूनच आघाडी घेतली आहे. सर्वांत पहिल्या विशेष कोरोना वार्डची निर्मिती, सातारा जिल्ह्यातील पहिली कोरोना चाचणी लॅब, कोरोना लस संशोधनात सहभागी असणारी जिल्ह्यातील एकमेव संस्था अशी कामगिरी करणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीस मान्यता मिळाली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र अन्न व औषध प्रशासनाकडून हॉस्पिटलला नुकतेच प्राप्त झाले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अद्यापपयर्त प्रभावी औषध निर्माण झालेले नाही. तसेच त्याच्या प्रतिबंधाची लसही अजून संशोधनाच्या प्रतीक्षेत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यापैकी प्लाझ्मा थेरपी हा एक आशेचा किरण म्हणून पुढे येत आहे. सातारा जिल्ह्यात कृष्णा हॉस्पिटलमध्ये गरजू रूग्णांवर या प्लाझ्मा थेरपीचा अवलंब केला जाणार आहे.

जे रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, अशा रूग्णांनी आपल्या रक्तातील प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्राप्त होणारा प्लाझ्मा गरजू रूग्णांसाठी वापरला जाणार असून, अन्य रूग्णांना मागणीप्रमाणे उपलब्धदेखील करून दिला जाणार आहे. कृष्णा हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीस मान्यता मिळाल्याने, याचा मोठा लाभ सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांना होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’ 

Leave a Comment