कोरोनानंतर आणखी एका विषाणूचा धोका; ICMRकडून सतर्कतेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना नावाच्या विषाणूने घातलेला धुडगूस आजही कायम आहे. चीनच्या वुहान शहरातून निघालेल्या कोरोनाने साऱ्या जगाच्याच नाकीनऊ आणले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो. आजही दिवसाला एक लाखाच्या आसपास रुग्ण देशात सापडत आहेत. या महामारीने झालेले आर्थिक नुकसान दुरगामी आहे. मात्र अशातच आता नव्या व्हायरसचा शोध लागला आहे.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरच्या वैज्ञानिकांनी कॅट क्यू व्हायरस (CQV) नावाचा एक विषाणू शोधून काढला आहे. या विषाणूमध्ये देशात रोगाचा प्रसार करण्याची क्षमता आहे. तसेच, हे विषाणू आर्थ्रोपॉड-जनित विषाणूंच्या श्रेणीमध्ये येतात. ते कुलेक्स नावाच्या डासांच्या व्यतिरिक्त डुकरांमध्ये देखील आढळतात. वृत्तानुसार, चीन आणि व्हिएतनाममधील लोक मोठ्या प्रमाणावर या सीक्यूव्ही विषाणूमुळे पीडित असल्याचे आढळले आहे. भारतात सुद्धा सीसीक्यूपासून होणारा रोग पसरण्याची शक्यता आहे.

भारतात दोन लोकांच्या सीरम नमुन्यांमध्ये अँटी-सीक्यूव्ही आयजीजी अँटीबॉडीज आढळले आहेत. आयसीएमआरच्या वैद्यकीय जर्नल आयजेएमआरच्या म्हणण्यानुसार, हे दोन्ही नमुने कर्नाटकात २०१४ आणि २०१७ मध्ये घेण्यात आले होते. आयसीएमआरच्या वैज्ञानिकांनी असा इशारा दिला आहे की, जर हा विषाणूचा प्रसार झाला तर सार्वजनिक आरोग्यावर संकट उद्भवू शकते. दोन्ही व्यक्तींच्या सीरम नमुन्यांमध्ये अँटी-सीसीक्यू आयजीजी अँटीबॉडीज सापडल्यावर डासांमधील सीक्यूव्हीच्या रेप्लिकेशन म्हणजेच संख्या वाढविण्याच्या क्षमतेची तपासणी करण्यात आली. संशोधकांच्या मते, हे सूचित करते की, भारतात सीक्यूव्ही-जनित रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बचावात्मक पावले उचलणे आवश्यक आहे. विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, जास्तीत जास्त लोकांना सीरमच्या नमुन्यांची तपासणी आणि चाचणी करणे आवश्यक आहे.

सीक्यूव्ही विषाणूचे प्राथमिक होस्ट डुक्कर आहेत आणि याचा प्रसार करणाऱ्या डासांमुळे लक्षात येते की, भारतात ऑर्थोबुनिया विषाणू गंभीर आरोग्याच्या संकटाला कारणीभूत ठरू शकते, असे आयसीएमआरच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. आयसीएमआरने सांगितले की, मानवी सीरम नमुन्यांमध्ये अँटी सीव्हीसी आढळल्यानंतर भारतातील डासांमधील त्याचे वागणे समजण्यासाठी तीन वेगवेगळ्या प्रजातींचे परीक्षण केले गेले. या तपासणीत असे दिसून आले आहे की, भारतात आढळणारे डास विषाणूच्या प्रति संवेदनशील आहेत आणि सहज संक्रमित होऊ शकतात. हे डास इतर डुकरांना आणि मानवांमध्ये देखील संसर्ग पसरवू शकतात.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, सीक्यूव्हीसाठी मॉलिक्युलर आणि सेरोलॉजिकल तपासणी विकसित करण्याची आवश्यकता आहे. लोकांव्यतिरिक्त डुकरांची तपासणी आणि डासांमधील याचे रेप्लिकेशन देखील तपासणी आवश्यकता आहे. असे यासाठी केले पाहिजे की, जेणेकरून संकट गंभीर होण्यापूर्वी आवश्यक तयारी केली जाऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment