एकनाथ खडसेंच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशावर बहीण प्रीतमनंतर पंकजा मुंडेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाल्या..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं खडसे यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच खडसे यांच्या भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभेतल्या पराभवानंतर पंकजा मुंडे याही नाराज होत्या. त्यांनी ती नाराजी अनेकदा जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. एका व्यासपीठावर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्रितपणेही काही जाहीर कार्यक्रमांमधून आपल्या मनातली खदखदही बोलून दाखवली होती. पंकजा मुंडे यांची नुकतीच भाजपच्या राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपने केला असल्याचं म्हटलं जातं.

त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशावर पंकजा मुंडे काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यावर आज पतिक्रिया देताना पंकजा म्हणाल्या कि, ‘एकनाथ खडसे हे भाजप सोडून जाणार नाहीत याची मला खात्री आहे. खडसे हे अनुभवी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत’ असंही त्यांनी सांगितलं. ‘खडसे पक्ष सोडतील, असं मला वाटतं नाही. ही फक्त चर्चा आहे. जसा एखादा नेता पक्षात आला तर फायदा होतो, तसाच सोडून गेल्यावर नुकसान होतं,’ असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

यापूर्वी, पंकजा यांच्या बहीण खासदार प्रीतम मुंडे यांना खडसेंच्या पक्षांतरावर विचारलं असता, ‘खडसेकाकांच्या पक्षांतराबाबत त्यांच्या सुनबाई खासदार रक्षा खडसे यांनाचं विचारा’, असं त्या म्हणाल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ खडसे यांनी राज्यात भाजप पक्ष वाढवला. खडसे यांचे मुंडे कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळं खडसे यांच्या संभाव्य पक्षांतरावर मुंडे कुटुंबीयांची भूमिका महत्वाची आहे. दरम्यान, या विषयावर अधिक काही बोलणं मुंडे भगीनींनी सध्या तरी टाळलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment