मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग बांधणारे श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार ? ; शिवसेनेचा भाजपला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सीमावादा वरून काही दिवसांपासून भारत आणी चीन मध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यावरूनच शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. भारताने पाकिस्तान प्रमाणे चीनला दम देण्यापेक्षा कृतीची गरज असल्याचा सल्ला शिवसेनेने केंद्रातल्या भाजप सरकारला दिला आहे. भारत-पाक सीमेवर झालेल्या चकमकीत भारताचे तीन जवान शहीद झाले, त्यापैकी दोन जवानांच्या तिरंग्यात लपेटलेल्या शवपेट्या महाराष्ट्रात आल्या. या शवपेट्या जवानांच्या गावी पोहोचल्या तेव्हा महाराष्ट्रातील भाजप पुढारी काय करीत होते? असा सवाल करत मुंबई महानगरपालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग ज्यांनी बांधला आहे, त्यांनी श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार? ते स्पष्ट केले पाहिजे असेही शिवसेनेने सामना अग्रलेखात म्हंटल आहे.

नक्की काय म्हंटल आहे सामना अग्रलेखात

चीनने पेच टाकला आहे व आम्ही हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तानच्या कैचीत अडकून पडलो आहोत. कश्मीर खोऱ्यात शांतता नांदायला तयार नाही. सीमेवर धुमशान व आतमध्ये कमालीची खदखद आहे. कश्मिरातील विषय गंभीर खरेच, पण चीनची आक्रमकता व घुसखोरीकडे डोळेझाक करून चालणार नाही. ज्या जोशात पाकिस्तानचे नाव घेऊन दम भरला जातो त्याच पद्धतीने चीनला दम देण्यापेक्षा कृतीची गरज आहे. वाटल्यास श्रीनगर,पाकव्याप्त कश्मीर वगैरेंवर भगवा फडकवण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांची नियुक्ती करावी, पण चिनी सैन्य चारही बाजूंनी धडका देत आहे त्यांना कधी रोखणार? चीनचे काय करणार? डोकलाममध्ये चिनी सैन्य घुसले. हिमाचल, अरुणाचल, उत्तराखंडच्या सीमेवर ते घुसण्याच्या तयारीत आहे. लडाखच्या जमिनीवर ते मांड ठोकून बसले आहे. कुणाला त्याची चिंता आहे काय? असे सवाल शिवसेनेने उपस्थित केले आहेत.

चिनी सैन्याने भारताच्या हद्दीत लडाखमध्ये घुसखोरी केली. चिनी सैन्य जे आत घुसले ते मागे जायला तयार नाही. मागे हटण्यासंदर्भात दोन देशांतील सैन्य अधिकाऱ्यांत चर्चा, वाटाघाटी सुरू आहेत. चिनी आमच्या जमिनीवर घुसले आहेत, पण चर्चा, वाटाघाटीचा मार्ग आपण स्वीकारला हे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. जमीन आमची व ताबा चिनी सैन्याचा, पण चीनचे नाव घेऊन आमच्या पंतप्रधानांनी, संरक्षणमंत्र्यांनी, भाजप पुढाऱ्यांनी दम भरल्याचे चित्र दिसत नाही. हे सर्व दमबाजी प्रकरण पाकिस्तानसाठी राखीव असावे. चीनचा विषय निघालाय म्हणून सांगायचे, भारताचा मित्रदेश भूतानच्या हद्दीत चीनचे सैन्य घुसले असून डोकलामजवळचे एक गाव ताब्यात घेतले. हे गाव भूतान-हिंदुस्थानच्या सीमेवर आहे. तेथे चीनने घुसणे हे आमच्यासाठी खतरनाक आहे. त्याआधी डोकलाम सीमेवर चिनी सैन्य घुसलेच होते व तेथे भारतीय सैन्याबरोबर वारंवार झटापट झाली आहे. आता डोकलाम पार करून चिनी सैनिक आत गावात जाऊन बसले आहेत. भूतानच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची जबाबदारी भारतीय सैन्याची आहे. कारण भूतान अस्थिर होणे म्हणजे भारताच्या सीमांना भगदाड पाडण्यासारखे आहे. पाकिस्तानने नव्हे तर चिनी सैन्याने आमच्या सीमा साफ कुरतडल्या असून दिल्लीश्वर डोळे झाकून हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तानच्या झांज-चिपळ्या वाजवीत आहेत.

भारतीय सैन्याने गेल्या चार दिवसांत पाकच्या हद्दीत गोळाबारूद फेकून त्यांच्या चौक्या वगैरे मारल्या, बंकर्स पेटवले हे खरे, पण आमच्या हद्दीत आमचेच जवान मारले गेले. त्यातील दोन जवानांच्या तिरंग्यात लपेटलेल्या शवपेट्या महाराष्ट्रात आल्या. या शवपेट्या जवानांच्या गावी पोहोचल्या तेव्हा महाराष्ट्रातील भाजप पुढारी काय करीत होते? ते मुंबईत छठपूजेची मागणी करीत होते. त्यातले काही मंदिरे उघडा, मंदिरे उघडा असे शंख फुंकत होते, तर काही जण मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्यासाठी प्रेरणादायी भाषणे ठोकीत होते. देशापुढील गंभीर स्थितीचे भान विसरल्यावर दुसरे काय व्हायचे? कश्मीर खोऱ्यातून तिरंग्यात लपेटलेल्या जवानांच्या शवपेट्या येत आहेत, पण श्रीनगरच्या लाल चौकात जाऊन तिरंगा फडकवणे हा अद्याप गुन्हा ठरत आहे. मुंबई महानगरपालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग ज्यांनी बांधला आहे त्यांनी श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार ते स्पष्ट केले पाहिजे.

लडाखच्या हद्दीत चिनी सैन्य बसले आहे. त्यांनी तेथे बांधकाम करून रेड आर्मीचे लाल निशाण फडकवले आहे. ते लाल निशाण आधी उतरवून दाखवा व मगच मुंबईवरील तेजस्वी भगव्याशी नाद करा. असे आव्हान यावेळी शिवसेनेने भाजप नेत्यांना दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook