पहाटेच्या शपथविधीला १ वर्ष पूर्ण! अमावस्येच्या फेऱ्याच्या वर्षपूर्तीवर भाजप नेते भ्रमिष्ठ झालेत; संजय राऊतांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । संपूर्ण महाराष्ट्र साखरझोपेत असताना आजपासून बरोबर १ वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राजभवनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. आज या घटनेला एक वर्ष पूर्ण होतंय. याच विषयी बोलताना संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली. पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष झालं आहे. अमावस्येच्या फेऱ्याला एक वर्ष पूर्ण झालंय. भाजप नेते भ्रमिष्ठ झाले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्याकडे लक्ष देऊ नये, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली. (Shivsena Sanjay raut Attacked bjp)

“महाराष्ट्रातील भाजप नेते पातळी सोडून टीका करत आहेत. शरद पवार हे छोटे नेते आहेत असं भाजप नेते म्हणाले, मग नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिला मग मोदी सरकारला कळत नाही का?”, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.“शरद पवार यांच्यासारख्या नेत्यावर अशा प्रकारची टीका करणे म्हणजे तुमचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. सत्ता येते जाते. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्या सारख्या नेत्यांची उंची कोणी काही बोललं म्हणून कमी होत नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

“देशात तसंच जगात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. पंतप्रधान मोदी याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. कोरोनाचं संकट दुसऱ्या महायुद्धासारखं गंभीर हे मोदी सांगतात, पण हे गंभीर संकट महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कळत नसेल तर मला असं वाटतं की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची ही कमतरता आहे. अख्ख्या देशात मोदी काय सांगतात ते समजतं पण महाराष्ट्रातील भाजपच्या पुढाऱ्यांना ते कळत नाही”, असं टीकास्त्र राऊतांनी भाजपवर सोडलं. कोरोना हा विषय राजकारण करण्याच्या नाही. सर्वांनी एकत्र येऊन या संकटाशी सामना करावा. पक्ष आणि राजकारण दूर ठेवून मानवतेच्या दृष्टीने जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. पंतप्रधान मोदी बरोबर म्हणतात दुसऱ्या महायुद्धासारखंच हे संकट आहे. भाजपचे महाराष्ट्रातील पुढारी एका वेगळ्या दिशेने लोकांना घेवून जात आहेत, असं राऊत म्हणाले. (Shivsena Sanjay raut Attacked bjp)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment