हाथरस प्रकरणात कारवाईसाठी योगीजी १५ दिवस पंतप्रधानांच्या फोनची वाट पाहत होते का? प्रियांका गांधींचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । हाथरस गँगरेप प्रकरणात कुटुंबाऐवजी पोलिसांनीच बळजबरीने पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचं समोर आल्यानंतर सर्व स्तरांतून उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रकरणातील कारवाईबाबत दिरंगाईबाबद्दल प्रश्नाच्या फैरी झाडल्या आहेत. पीडितेवर अत्याचाराची घटना १४ तारखेला घटना घडली असताना या प्रकरणात कारवाई करण्यासाठी योगी आदित्यनाथ १५ दिवस पंतप्रधानांच्या फोनची वाट पाहत होते का? असा सवाल काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी विचारला आहे.

‘मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारू इच्छिते’ असं म्हणत प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट टीका केलीय. ‘कुटुंबीयांकडून जबरदस्तीनं पीडितेचं शव ताब्यात घेत जाळून टाकण्याचे आदेश कुणी दिले? गेल्या १४ दिवसांपासून तुम्ही झोपलेलात का? तेव्हा तुम्ही कारवाई का केली नाही?’ असे प्रश्न विचारत प्रियांका यांनी योगींवर हलगर्जीपणाचा आरोप केला.

‘ही घटना १४ तारखेला घडली. आज ३० तारीख आहे. आज पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर भाष्य केलं. यावेळी, त्यांनी पंतप्रधानांकडून फोन केला आणि एसआयटी नियुक्त करण्यात आल्याचं आज योगींनी म्हटलं. कारवाई करण्यासाठी तुम्ही पंतप्रधानांच्या फोनची वाट पाहत होता काय? गेल्या १५ दिवसांत तुम्ही काहीही करू शकला नाहीत?’ असं म्हणत प्रियांका गांधी यांनी योगी सरकारच्या ढिसाळ कारभारावर टीका केली.

‘पीडित मुलीला उपचारांसाठी चांगल्या रुग्णालयात लवकरच हलवण्यात आलं नाही. परवा रात्री तिला दिल्लीला आणण्यात आलं. तिच्या कुटुंबीयांसोबत अमानवीय व्यवहार करण्यात आला. आपल्या मुलीचा मृतदेहही शेवटी एकदा ते आपल्या घरी नेऊ शकले नाहीत. तिच्या मृतदेहावर वडिलांनाच अंत्यसंस्कार करता आले नाहीत. कुटुंबाला एका घरात कोंडून ठेवण्यात आलं. हे अमानवीयतेचं सर्वात मोठं उदाहरण आहे. काय काय होतंय उत्तर प्रदेशमध्ये आणि मुख्यमंत्री कोणतीही जबाबदारीपासून पळ काढतात. तुमच्या राज्यात महिलांच्या सुरक्षेची कोणतीही चिंता नाही, जबाबदारी नाही? मग तुम्ही कसे मुख्यमंत्री आहात’ असं म्हणत प्रियांका गांधी यांनी थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धारेवर धरलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment