कण्हेर येथून आजारी दाम्पत्याचे घर फोडून साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

सातारा | कण्हेर येथील गणेशनगर वस्तीमध्ये घरफाेडी झाल्‍याचा प्रकार गुरूवारी दि. 23 रोजी सकाळी उघडकीस आला आहे. या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे बारा तोळे सोने व 60 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. गणेशनगर वस्तीमधील दादासो सर्जेराव वाघमळे यांचे बंद असलेले घर चाेरट्यांनी फोडले. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली .

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी. गणेशनगर वस्तीतील रहिवासी पाटबंधारे विभागाचे निवृत्त अधिकारी दादासो वाघमळे हे त्यांच्या पत्नीसह आजारी असल्याने उपचारार्थ रूग्णालयात दाखल झाले होते. याचदरम्यान वस्तीतील त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. गुरुवारी सकाळी त्यांचे नातेवाईक घरी आले असता, कुलूप तोडून कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त झाल्याचे दिसल्याने चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

घराला कुलूप, वस्तीत सामसूम या परिस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी समोरील दरवाजाचे कुलूप तोडून चोरी केली आहे. याबाबत वाघमळे यांनी सातारा तालुका पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल महेंद्र पाटोळे करत आहेत.

 

You might also like