तर इंधन 50% ने स्वस्त होईल…पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींवर नितिन गडकरींची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रचंड वाढ होत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले की,”आता इंधनाच्या पर्यायी स्रोतांचा वापर करणे आवश्यक आहे.” ते म्हणाले की,” पर्यायी स्त्रोत, विशेषतः मिथेनॉल, वापरण्याच्या शक्यता तपासल्या गेल्या पाहिजेत.” याशिवाय जलमार्ग हे सर्वात स्वस्त वाहतुकीचे साधन असल्याने व्यापार आणि मालाच्या वाहतुकीसाठी जलमार्गाला चालना देण्याच्या गरजेवरही गडकरींनी भर दिला.

मंगळवारी ‘वॉटरवेज कॉन्क्लेव्ह-2022’ला संबोधित करताना गडकरी यांनी ही माहिती दिली. “पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता, आता स्वस्त आणि सहज उपलब्ध पर्याय शोधणे अत्यावश्यक झाले आहे,” असे ते म्हणाले. डिझेलपेक्षा मिथेनॉल खूपच स्वस्त आहे आणि डिझेल इंजिनला मिथेनॉलवर चालणाऱ्या इंजिनमध्ये रूपांतरित करू शकणारे तंत्रज्ञान आहेत, असा दावा त्यांनी केला.

गडकरी म्हणाले, “पर्यायी इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. मिथेनॉल जास्त वापरता येते. इंधनातील नवीन तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे.” ते पुढे म्हणाले की,” आसाम सध्या दररोज 100 टन मिथेनॉलचे उत्पादन करत आहे आणि ते 500 टनांपर्यंत वाढवेल आणि तंत्रज्ञानातील बदलांचा फायदा होऊ शकतो.”

केंद्रीय मंत्री म्हणाले, “आम्ही मिथेनॉलवर चालणारी सागरी इंजिने विकसित करू शकतो आणि त्यात डिझेल इंजिनचे रूपांतर करू शकतो. डिझेल इंजिनांना मिथेनॉल इंजिनमध्ये रूपांतरित करण्याचे तंत्रज्ञान स्वीडिश कंपनीकडे आहे. मिथेनॉलच्या वापरामुळे इंधनाची किंमत 50 टक्क्यांपर्यंत कमी होईल. मी सर्बानंद सोनेवालजी (केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग व्यवहार मंत्री) यांना याकडे लक्ष देण्याची विनंती करेन.”

जलमार्गाचा जास्तीतजास्त वापर करण्यावर भर देत गडकरी म्हणाले की,” यामुळे व्यापार-व्यवसायात वाढ होईल. यासोबतच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊन लोकांचे दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होईल आणि शेवटी हे सर्व मिळून आपला जीडीपी वाढण्यास हातभार लागेल.”

रस्त्याने वाहतुकीचा खर्च 10 रुपये असेल तर रेल्वेमार्गे 6 रुपये येतो, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, जलमार्ग वापरल्यास, हा खर्च फक्त 1 रुपये इतका खाली येतो. गडकरी म्हणाले की,”सध्याचा वाहतुकीचा खर्च खूप जास्त आहे आणि तो 8-10 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याची गरज आहे. असे झाल्यास निर्यातीला चालना मिळेल आणि जगभरातील भारतीय उत्पादने अधिक स्पर्धात्मक बनतील.”

Leave a Comment