कराड दक्षिणमधील 5 ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीसाठी 75 लाखांचा निधी : आ. पृथ्वीराज चव्हाण

गोटे, येणके, धोंडेवाडी, तुळसण व म्हासोली या गावाच्या इमारतीचा समावेश

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गोटे, येणके, धोंडेवाडी, तुळसण व म्हासोली या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम हे 35 ते 40 वर्षांपूर्वी झालेले असून इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. जुन्या इमारतीमध्ये जागा अत्यंत तोकडी असून रोजचे कार्यालयीन काम करणे त्रासदायक ठरत आहे. यामुळे बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय बांधणी योजनेअंतर्गत निधी मंजूर व्हावा. यासाठी माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांकडे निधीची मागणी केली होती त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला 15 लाख रुपये असा एकूण 75 लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.

गावातील ग्रामस्थांचे दैनंदिन कामासाठी ग्रामपंचायतीत येणे जाणे असते. यासाठी ग्रामपंचायतीच्या इमारती सुस्थितीत असणे आवश्यक असते. आ. पृथ्वीराज चव्हाण मतदारसंघातील दौऱ्यादरम्यान गावागावांना भेटी देत असतात. यावेळी ग्रामस्थांच्या सोबत चर्चा करताना घेतलेल्या माहितीनुसार व प्रत्यक्ष पाहणीनुसार या पाच ग्रामपंचायतीचे बांधकाम नवीन होणे आवश्यक असल्याने या ग्रामपंचायतीना निधी मिळण्यासाठी आ. चव्हाण यांनी प्रयत्न केले होते, हा निधी मंजूर झाला असल्याने लवकरच या गावांना नवीन ग्रामपंचायत कार्यालय मिळेल.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आज महाविकास आघाडी सरकार अत्यंत चांगल्या पध्दतीने काम करत आहे. कोरोनाच्या संकटानंतरही विकासकामे सुरू आहेत. कराड दक्षिणमध्ये काॅंग्रेसच्या माध्यमातून गावच्या मुख्य इमारत ती म्हणजे ग्रामपंचायत असते, त्यांचाही प्रश्न सोडवताना आनंद होत आहे.