जवान मंदार नलवडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

खटाव | वेटणे (ता. खटाव) गावचे सुपुत्र व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा जवान मंदार मानसिंग नलवडे (वय- 32) यांचा बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास देशसेवा बजावीत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्यांना रात्री उशिरा साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. जवान मंदार यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्री शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

वेटणे येथील मंदार नलवडे 12 वर्षापूर्वी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल जी. डी. पदावर नोकरीस रुजू झाले. गेली बरेच दिवस मुंबई येथील न्हावाशेवा बंदरावर ड्युटी करत होते. बुधवरी पहाटे पाचच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. काल दुपारपासून पार्थिव वेटणे येथे येणार असल्याने गर्दी जमायला सुरुवात झाली. रात्री उशिरा 11 वाजता मंदार याचे पार्थिव गावात आल्यानंतर कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये पार्थिव ठेवून गावातून मिरवणूक काढण्यात आली. अंत्यदर्शनासाठी जनसमुदाय लोटला होता. मंदार नलवडे अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा उपस्थितांनी दिल्या.

सातारा पोलीस दलाच्या जवानांनी बिगुल वाजवून व बंदूकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी मंदार यांची पत्नी, लहान मुलगा, आई वडिल व लहान भाऊ यांनी अंत्यदर्शन घेतले. सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर जवान मंदार यांच्या पार्थिवास वडिल मानसिंग यांनी अग्री दिला . त्यावेळी अनेकांच्या अश्रुंचा बांध फुटला.