व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

गडचिरोली : तोडगट्टा खाणविरोधी आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, झोपड्यांची नासधूस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एटापल्ली तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील तोडगट्टा येथे गेल्या २५० दिवसांपासून खाणविरोधी आंदोलन सुरू आहे. या खाणविरोधी आंदोलनातील महत्त्वाच्या नेत्यांना पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे. 20 नोव्हेंबर रोजी सोमवारी सकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वांगीतुरी पोलीस मदत केंद्राच्या उद्घाटनासाठी या मार्गावरून जाणाऱ्या जवानांना काही आंदोलकांनी अडविल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस विभागाने म्हटले आहे. आंदोलकांनी ही पोलीस प्रशासनाची बळजबरी असल्याचे म्हटले आहे. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

 

पेसा, ग्रामसभेचे कायदे मोडून खाणी- ग्रामस्थांचा आरोप

 

एटापल्ली तालुक्यात प्रस्तावित आणि सूरजागड येथे सुरू असलेल्या लोहखाणीला येथील ग्रामसभा व आदिवासी नेत्यांचा विरोध आहे. पेसा, ग्रामसभेचे कायदे मोडून या भागात खाणी सुरू करण्यात येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील तोडगट्टा येथे मागील २५० दिवसांपासून ‘दमकोंडावाही बचाव संघर्ष समिती’च्या नावाखाली ग्रामसभांचे साखळी आंदोलन सुरू आहे. तालुक्यातील प्रस्तावित लोहखाणींसह बेसेवाडा, दमकोंडावाही, आदी लोहखाणीला ग्रामसभेचा विरोध आहे. सूरजागड पारंपरिक इलाका समितीतील ४० पेक्षा अधिक ग्रामसभांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शासनाला या भागाचा विकास करायचा असेल तर अधिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर द्यायला हवा. परंतु शासनाला केवळ येथील खाणींमध्ये रस आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, या आंदोलनाला नक्षलवाद्यांची फुस आहे, अशी शंका पोलीस विभागाने वेळोवेळी व्यक्त केली आहे. दरम्यान, याभागात सकाळच्या सुमारास पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला व आंदोलनातील महत्त्वाच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले.

 

पोलिसांनी आदिवासींच्या झोपड्यांची नासधूस केली, असा आरोप आंदोलकांनी  केला आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना विचारणा केली असता ते म्हणले की, वांगीतुरी येथे पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन असल्याने दोन दिवसांपासून पोलीस जवान या भागात तैनात करण्यात आले आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास तोडगट्टा येथे काही आंदोलकांनी पोलिसांना अडवून हुज्जत घातली, त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. नक्षलवाद्यांच्या दबावामुळे मागील आठ महिन्यांपासून आंदोलनाला बसलेले गावकरी वैतागले असून त्यांनी स्वतःहून आंदोलनस्थळावरील झोपड्या काढल्या, पोलिसांनी कोणतीही बळजबरी केलेली नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.