नुकसान भरपाई नाकारल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; अधिकारी म्हणतात, तो शेतकरी नसून अतिक्रमणधारक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पावसामुळे शेतात झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून आर्थिक मदतीची मागणी केली असता जिल्हाधिकाऱ्यांचे असंवेदनशील बोलणे सहन न झाल्याने गडचिरोली येथील एटापल्ली तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. अजय दिलराम टोप्पो असं सदर मृत व्यक्तीचे नाव आहे. विशेष म्हणजे या आत्महत्येनंतर तो अतिक्रमणधारक होता, शेतकरी नव्हताच असा अजब दावा जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केला.

नेमकं काय आहे प्रकरण –

जिल्हाधिकारी संजय मीना एटापल्ली तालुक्यातील मंगेर या गावी विकासात्मक कामाचा आढावा घेण्याकरिता गेले होते त्यावेळी मलमपाडी गावातील जवळपास २६ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतीतील नुकसान भरपाईची मागणी केली. पहाडावरील गाळ शेतात साचल्यामुळे आमची पिके नष्ट झाली आहेत, त्यामुळे आम्हाला शासनाकडून मदत द्यावी,अशी मागणी त्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. मात्र, तुम्ही अतिक्रमणधारक आहात, तुमच्याकडे पुरावादेखील नाही. असं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनाच उलट सुनावले व मदतीबाबत असमर्थता दर्शवली.

अधिकाऱ्यांच्या बोलण्यानंतर अजय अस्वस्थ झाला. मदत मिळणार नाही मग शेतीसाठी उसनवारीने घेतलेले पैसे परत कसे करणार, याबाबत लहान भाऊ जगतपाल याच्याजवळ चिंता व्यक्त केली. त्यानंतर त्याने रात्री घरासमोरील झोपडीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणानंतर सदर मृत व्यक्ती हा अतिक्रमणधारक होता, त्याच्याकडे शासकीय जमीन नाही, म्हणून तो शेतकरीच नाही, असा अजब दावा जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केला. येव्हडच नव्हे तर तो उराव समाजाचा असून आदिवासीच नाही, असेही त्यांनी सांगितले. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे सोबतच त्याच्यावर कर्जही नाही त्यामुळे ही शेतकरी आत्महत्या कशी म्हणता येईल, असा उलट सवाल जिल्हाधिकाऱ्यांनी केला.

दरम्यान, मृत शेतकरी अजय याचा भाऊ जगतपाल टोप्पो यांनी मात्र आमच्या दोन पिढ्या शेतीच करत आहोत, येव्हडच नव्हे तर आम्ही प्रशासनाकडे वनहक्काचा दावादेखील केला आहे मग माझा भाऊ शेतकरी नाही, असे प्रशासन कसे काय म्हणू शकते. असा सवाल केला आहे. जिल्हाधिकारी म्हणतात आम्ही आदिवासी नाही तर मग माझे वडील दिलराम टोप्पो यांच्याकडे २००९ साली प्रशासनाने आदिवासी असल्याचा जातीचा दाखला दिला, तो खोटा आहे का? असाही प्रश्न त्यांनी केला.