Sunday, February 5, 2023

ठाकरे साहेब, आमच्या जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा ; गडचिरोलीतील ८११ गावांची मागणी

- Advertisement -

गडचिरोली | जिल्ह्यातील ऐतिहासिक दारूबंदी उठविण्यासाठी प्रयत्न सुरु होताच ८११ गावांनी ठराव घेऊन दारूबंदीला समर्थन दर्शविला आहे. साहेब, आमच्या जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रातून केली आहे.

जिल्ह्यातील अनेक कुटुंब उध्वस्त, महिलांना विधवा व भावी पिढीला व्यसनी बनविणारी दारू जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी १९८८ ते १९९२ पर्यंत चळवळ उभी राहली. समाजसेवक, राजकीय नेते व अनेक गावांच्या प्रयत्नांतून अखेर १९९३ मध्ये जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. त्यामुळे दारू पिणाऱ्यांच्या संख्येत घट झाली. गावातील तंट्यांचे प्रमाण कमी झाले. गावात सन उत्सव आनंदाने व शांततेत पार पाडले जातात. गावात दारू भेटतच नाही यामुळे तरुणांना याची सवय लागत नाही. या दारूबंदीचे जिल्ह्याला अनेक फायदे झाले. मात्र काही राजकीय नेत्यांनी दारूबंदी उठविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. जिल्ह्याच्या दारूबंदीला धोका असल्याची बाब कळताच ८११ गावे दारूबंदी टिकविण्यासाठी रिंगणात उतरले आहेत व इतर गावागावात ठराव घेणे सुरु आहे.

- Advertisement -

दारूविक्री सुरु झाली तर पुरुष, तरुण मुलं दारू प्यायला लागतील, गावो-गावी दारू विकली जाईल. बाईची इज्जत, बुजुर्गाचा सन्मान व गावाची एकी नष्ट होईल. कुटुंबाचे आर्थिक नियोजन बिघडेल. महिलांना त्रास सहन करावा लागणार. त्यामुळे दारूबंदी कायम ठेवण्यासाठी गावागावात ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले जात आहे. अहेरी तालुक्यातील ४४, आरमोरी ३६, भामरागड ७०, चामोर्शी ७६, देसाईगंज २८, धानोरा ८६, एटापल्ली ९९, गडचिरोली ८१, कोरची ६६, कुरखेडा ७६, मुलचेरा ५४ व सिरोंचा तालुक्यातील ९५ गावांनी दारूबंदीला समर्थन दर्शवित ठराव घेतला आहे. जिल्हाभरातील अशा एकूण ८११ गावांना दारूबंदी कायम हवी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’