व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

असा साजरा व्हायचा माझ्या गावात गणेशोत्सव..

गणेशोउत्सव विशेष | माधवी काकडे

खेड्यापाड्यात विजेच्या तारांनी प्रवेश केल्यावर उजळलेल्या गावांनी क्रांतिची स्वप्नं पहायला सुरुवात केली होती. माणसांचे डांबरीकरण न झालेल्या गावातल्या लोकांची मने अगदी साफ होती, नेक होती ती माणसे. त्याच 1995- 96 च्या दशकात माझा जन्म झाला.माझ्या बालपणी गणेशेत्सव कसा असायचा हे मी आज तुम्हाला सांगणारे. आज डॉल्बी अन डीजे च्या गेणेशोत्सवातही मी लहानपणीच बाप्पा का मिस करतीय हे तुम्हाला यातून लक्षात येईल.

शेती, माती, नाती आणि शाळेतले छोटे सोबती यांना बघत बघत मी मोठी होत गेले. तेंव्हा गावात कदाचित एकाकडेच टू व्हीलर असायची. नाहीतर सगळा प्रवास हा बैलगाडीतूनच. त्या बैलगाडीच्या चालीवर वाजणाऱ्या कितीतरी घुंगरांनी आपली गाथा इथल्या ओढ्या-नाल्यांना ऐकवली असेल. तो काळ खूपच चांगला होता. कळायला लागलं तसं शाळेत जायला लागल्यावर वडिलांनी आणलेली राजा पाटी. त्यावर काढलेला श्री गणेशा तेव्हापासून त्या गणेशाचे नी माझे नाते दृढ होत गेले. गावी गणेशोत्सव म्हणजे खूप धमाल असायची. सगळे नागरिक गट तट विसरून मंडळाच्या गणपतीला आरतीला यायचे. उकडलेले मोदक किंवा साखर, बर्फी कुस्करून वाटली जायची. त्याची चव आजच्या आधुनिक पदार्थाना नक्कीच नाही.

भल्या पहाटे डोक्यावर चिखली गणपती एका बुट्टीत घेऊन कुंभार आमच्या घरी यायचा. ज्यांच्या घरात रंगीत गणपती आहेत. त्यांनी आदल्या दिवशीच गणपती घरी आणलेले असायचे. आम्ही सकाळी लवकर उठून, अंघोळ करून, गणपतीला रात्रभर रंगवून तयार केलेल्या कपाटात बसवायचो. मग दुर्वा आणि आघाडा आणायला मंदिराकडे जायचो. आमच्या छोट्या छोट्या हातांनी काढलेली दुर्वा आणि फुले आम्ही भरलेल्या तांब्यात टाकायचो. देवाला नमस्कार करून आमची स्वारी घरी यायची. मग गणपतीची पूजा आणि मग आरती.

आरतीला सगळ्या मैत्रिणी असायच्या सुखकर्ता दुखहर्ता म्हणताना खड्या आवाजाची उंची वाढत जायची. वातावरण अगदी भक्तिमय व्हायचे. वाजणाऱ्या घंटीचा आवाज घरभर घुमायचा. आवाजाने रडणारी मुले गप्प बसायची. आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद दिला जायचा. कधी चिरमुरे, कधी साखर तर कधी कुस्करलेल्या बर्फीचा तुकडा हातात पडायचा. याचं प्रसादासाठी आम्ही गावभरच्या गणपतीच्या आरतीला जायचो. प्रसाद मुबलक मिळायचा. मग फटाक्यांना उत यायचा. 5 रुपयाला  मिळणारी फटाक्यांची माळ पुरवून पुरवून वापरायचो. न वाजणाऱ्या फटक्यातली दारू काढून त्याचा जाळ करण्यात आम्ही माहीर होतो. सायंकाळी हातपाय धुवून आम्ही मंडळाच्या आरतीला जायचो. मग घराघरात आरती व्हायची. सगळा आनंदी आनंद असायचा. पण आताचे आधुनिक गणपती दहा-दहा फुटावर अनेक मंडळे स्थापन झाली. गणेशोत्सवाला एक पैशाचे रूप आले. आता गणेशोत्सव तर होतो मोठाच पण त्यात ते प्रेम, माणुसकी मात्र कुठेच दिसत नाही. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे.