सोनाराला लुटणारी टोळी गजाआड : सोनारच टोळीचा मोरक्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

म्हसवड | म्हसवडपासून काही अंतरावर असणाऱ्या माळशिरस येथे रस्त्यावर दोघांनी एका सोनाराला लुटले होते. त्याला पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून दागिने घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 17 लाख 83 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयितांमध्ये म्हसवडमधील एका सोनाराचाही समावेश आहे.

सराफ व्यावसायिक दुर्वा ऊर्फ दुर्योधन नाना कोळेकर (वय- 34, रा. धुळदेव, ता. माण, जि. सातारा), योगेश तुकाराम बरडे (वय- 35, रा. पिलीव रोड, बरडे वस्ती, माळशिरस, जि. सोलापूर), रामदास विठ्ठल गोरे (वय- 20, रा. म्हसाळवाडी, ता. माण, जि. सातारा), रणजित भाऊ कोळेकर (वय- 20, रा. धुळदेव, ता. माण, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सराफ व्यावसायिक सुरेशकुमार हिंमतराव कुमावत (वय- 39, रा. अकलूज, जि. सोलापूर) हे 27 जुलै 2022 रोजी म्हसवडमधील सराफ व्यावसायिकांना दागिने देण्यासाठी आले होते. त्याच दिवशी सायंकाळी दुचाकीवरून ते परत जात असताना वाटेत अडवून त्यांना नकली पिस्तुलाचा धाक दाखवून चोरट्यांनी त्यांच्याकडील 15 लाखांचे दागिने चोरून नेले होते. याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतानाच या जबरी चोरीचा मुख्य सूत्रधार हा म्हसवडमधील दुर्वा कोळेकर हा सराफ असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चाैकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने त्याच्या अन्य सहकाऱ्यांचीही नावे सांगितली. यानंतर पोलिसांनी संबंधितांना पालघर, नालासोपारा येथून ताब्यात घेतले. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या जबरीचा चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत काैशल्याने छडा लावला. या चोरट्यांकडून 435 लगड स्वरूपातील सोने आणि कार, दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, उत्तम दबडे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, विक्रम पिसाळ, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, आदींनी ही कारवाई केली.