पुण्यात गँगस्टर मोहोळे आणि मुळशीच्या शेलार टोळीमध्ये गँगवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता बऱ्याच प्रमाणात कमी होत आहे. याचदरम्यान आता पुण्यामध्ये गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार यांच्यात पुन्हा एकदा व्यावसायिक वर्चस्ववादातून टोळी युद्ध झाले आहे. यामुळे पुण्यतील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. शरद मोहोळच्या सांगण्यावरून त्याच्या टोळीतील सदस्यांनी विठ्ठल शेलारवर हल्ला केला होता. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच गुंड विठ्ठल शेलार याने व्यावसायिक वादातून हगवणे याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली होती.

त्यामुळे गँगस्टर शरद मोहोळ याच्या सांगण्यावरुन सिद्धेश हगवणे, मल्हारी मसुगडे, आलोक भालेराव व त्यांच्या साथीदारांनी विठ्ठल शेलार व त्याचे साथीदार राधा चौकात असल्याचे समजून तेथे गेले. त्यावेळी तेथून एक गाडी जात होती. त्यात बसलेल्या विठ्ठल शेलारवर आणि त्याच्या साथीदारांवर दगड व कुंड्या फेकून मारल्या. तसेच राधा हॉटेल व तेथून येणार्‍या जाणार्‍या लोकांच्या जीवाची पर्वा न करता रोडवर दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत गुंड त्या ठिकाणाहून पसार झाले होते. ही घटना मागिल महिन्यात जवडी परिसरामध्ये घडली आहे. या दोन्ही गुंडांची दहशत एवढी आहे की त्या बाबत एकही नागरिक तक्रार द्यायला पुढे आला नाही. यानंतर पोलिसांनी स्वतःच पुरावे गोळा केले आणि शरद मोहळ आणि त्याच्या साथीदारा विरुद्ध गुन्हे दाखल केले.

कोण आहे शरद मोहोळ?
पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून मोहोळची ओळख आहे. शरद मोहोळ या टोळीने सरपंचाचे अपहरण करुन खंडणी उकळल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. यानंतर शरद मोहोळ आणि त्याचा साथीदार आलोक भालेरावला येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. यादरम्यान त्यांनी दहशतवादी कातिल सिद्दीकी याचा नाडीने गळा आवळून खून केला होता. मात्र या खटल्यामधून पुराव्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

कोण आहे विठ्ठल शेलार?
विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील गुंड आहे. विठ्ठल शेलार याच्याविरुद्ध खून, अपहरण, दरोड्याची तयारी आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर विठ्ठल शेलार याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

Leave a Comment