‘ग्लोबल टीचर’ डिसले गुरुजींना कोरोनाची बाधा; राजकीय नेत्यांनी सत्कारासाठी घातला होता गराडा

सोलापूर । सन्मानाचा ‘ग्लोबल टिचर पुरस्कार’ विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः डिसले गुरुजींनी दिली आहे. ‘माझ्यात काही लक्षणे दिसून आल्यानंतर मी कोरोना चाचणी करून घेतली, ती चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी,’ असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच रणजितसिंह डिसले गुरुजींना ‘ग्लोबल टिचर पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर ते प्रकाश झोतात आले होते. त्यांच्या यशानंतर राजकीय नेते सत्कारासाठी त्यांच्या संपर्कात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. सर्वात आधी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रणजितसिंह डिसले यांचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घरी जाऊन सहकुटुंब सत्कार केला आणि पेढे भरविले होते. तसेच त्यांच्या घरातून देवेंद्र फडणवीसांनाही दरेकरांनी फोन लावून दिला होता.

त्यानंतर काही दिवसांपूर्वी डिसले गुरुजी मुंबईत आले होते. मुंबईत त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब आणि पर्यावरण आदित्य ठाकरे, राज ठाकरेंची भेट घेतली होती. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह इतर नेत्यांच्याही त्यांनी भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतल्या अनेक प्रसार माध्यमांनीही त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. या सर्वात डिसले गुरुजी यांना आता कोरोनाची लागण झाल्याने एकाच खळबळ उडाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’