व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

वाळू कारवाईचा गोलमाल : तहसिलदाराची बदली अन् पाच तलाठी निलंबित

सातारा | माण- खटाव भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपसा होत असल्याबाबत कारवाई करतानाचा व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात आल्याने पाच तलाठ्यांचे निलंबन करण्यात आले. या भागातील तहसिलदारांचीही तात्काळ बदली करुन त्या ठिकणी नव्याने तहसीलदार नेमण्यात आले आहे. यात आता प्रातांधिकारी आणि तहसीलदार या दोघांनाही कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे. त्यामुळे यांच्यावरही कारवाई होणार का? याकडे लक्ष लागू आहे.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वाकी या गावात बेकायदा वाळू उपसा होत असल्याबाबतचे सातारा जिल्हाधिकारी यांना समजल्यानंतर त्यांन येथील प्रांत तहसीलदार यांना अलर्ट केले होते. 22 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री याच भागात वाळू उपसा होत असल्याचे जिल्हाधिकारी यांना समजल्यानंतर त्यांनी याबाबत तात्काळ जाण्याचे आदेश दिले होते. त्या ठिकाणी 10 ते 12 आज्ञात लोक आले आणि त्या ठिकाणी आम्हाला घोळका करुन उभारले असे तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी अहवालात म्हटले होते. त्यानुसार पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याबाबत वरिष्ठांकडून सांगण्यात आले होते.

मात्र पोलिसांनी अज्ञातांबाबत गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यानतंर तसा अहवालही सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. मात्र आता धाडीबाबत एक ऑडिओ क्लिप आणि एक व्हिडीओ क्लिप सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना पाठवली. त्यात या भागाचे प्रातांधिकारी, तहसिलदार, तलाठी हे यात आरोपीला क्लिनचिट देण्यासाठी वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समोर आले.

हे स्पष्ट झाल्यानंतर माणचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांची तात्काळ बदली केली आहे. शिवाय यामध्ये जांभुळणीचे तलाठी बी.एस.वाळके, वाकी गावातील तलाठी एस.एल.ढोले, मार्डी गावचे तलाठी वाय.बी.अभंग, खडकी गावचे तलाठी एस.व्ही.बडदे, वरकुटे-म्हसवडचे तलाठी जी.एस.म्हेत्रे, या पाच तलाठ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणातील चौकशीत आता तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांचाही हात आहे का? हे ही काही दिवसात समजेल.

त्या पाच तलाठ्यांवर नेमका काय ठपका ?

त्याचबरोबर तहसीलदार माण यांनी अवैध गौण खनिज वाहतूक उत्खनन रोखणेकामी नेमूण दिलेल्या कामात अक्षम्य हलगर्जीपणा, मंडल अधिकारी म्हसवड के.पी. शेंडे पथक प्रमुख यांचे समवेत या कार्यालयास चुकीचा अहवाल सादर करुन प्रशासनाची दिशाभूल करणे, गौण खनिजाची अवैधरित्या विल्हेवाट लावण्यासाठी कारणीभूत प्रशासनाची प्रतिमा मलीन करणे,गौण खनिजाची अवैध व वाहतूक करणाऱ्या इसमांशी तडजोड करत असलेचे व्हिडोओ रेकॉर्डिंग वरुन दिसून येत आहे. जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48(7) (8) नुसार वाहन जप्तीचे अधिकार असतांना सदर नियमांस बाधा निर्माण करणे. गौण खनिज सारख्या महसूल मिळवून देणाऱ्या व पर्यावरणाचा समतोल साधणाऱ्या संवेदनशील प्रकरणात कसूर व बेजबाबदारपणा दाखविल्याने त्यांची एक वेतनवाढ कायम स्वरुपी रोखणे,पदास नेमून दिलेल्या कामामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणे असे दोषारोपपत्र उपविभागीय अधिकारी यांचेकडे दाखल केले आहे.

तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना नोटिसा

माण-खटावचे उपविभागीय अधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 चा नियम 3 चा भंग केला आहे. शासकीय कर्मचारी या नात्याने त्यांनी शासकीय सेवा करताना सचोटी कर्तव्यतत्परता व शासकीय कर्मचाऱ्यांला न शोभेल असे वर्तन करून त्यांना कर्तव्यात कसूर व बेजबाबदारपणा दाखविल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल ) नियम 1979 चा नियम 4 (1) (अ) अशी नोटिस बजावले आहे