सरकारचं नवं फर्मान : शेतकऱ्यांचं वीजबिल ऊस बिलातून वसूल करणार

सातारा | सरकारचं नवं फर्मान शेतकऱ्यांचं वीजबिल ऊस बिलातून वसूल करणार असल्याचे पत्र साखर संचालकांच्यासोबतच्या बैठकीनंतर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कार्यालयाकडून सर्व साखर कारखान्यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच या निर्णयाला विरोधही होवू लागला असताना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी असा निर्णय यापूर्वीच झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

शेतकऱ्यांच्या मोटारीचे वीज बिल कारखान्यांकडे असलेल्या ऊस बिलाच्या माध्यमातून वसूल करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी आज पुण्यात साखर संचालकांसोबत वीज वितरण कंपनीच्या आधिकाऱ्यांची बैठक झाली. साखर संचालक शेखर गायकवाड यांच्या कार्यालयाकडून सर्व साखर कारखान्यांना या संदर्भातील पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी दि. 29 रोजी दुपारी चार वाजता ही ‘ऑनलाइन’ बैठक होती. या बैठकीत शेतकऱ्यांचा वीजबिल वसूल करण्याचा निर्णय घेतला असल्याने साखर आयुक्तांवरही नाराजी दिसू लागली आहे.

या निर्णयामुळे राज्य सरकार व महावितरण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही वसुली योजना महावितरणने आखली असून राज्य सरकारच्या साखर संचालकांमार्फत अमंलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अधिक नैसर्गिक संकटामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांना त्रास देण्याचा उद्योग राज्य सरकारकडून केला जात असल्याचे या कृतीवरून दिसत आहे.

वीजबिल वसुली करून दिल्यास साखर कारखान्यांना लाभ : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

महावितरणने पूर्वी निर्णय घेतला. वीजबिल वसुली वेळेवर होत नाहीत, ज्या संस्था यामध्ये सहकारी कारखानदार यांनी जर वीजबिलाची वसुली करून दिली तर त्याच्या काही प्रमाणातील लाभ सहकारी संस्थाना द्यायचा असा निर्णय पूर्वीच झालेला आहे. त्या संदर्भात साखर आयुक्तांनी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष वीजबिल भरण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठी हा नविन उपक्रम हाती घेण्याचा निर्णय झाला आहे. मूळ हा निर्णय पूर्वीच झालेला आहे. महावितरण कंपनी अनेक प्रकारचे वसुली करण्याचा संकल्पना राबविली आहे. त्यामध्ये सहकारी कारखान्यांनी पुढाकार घ्यावा ही संकल्पना त्यामध्ये होती, असे स्पष्टीकरण सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहे.

वीजबिल वसुल कारखान्यांवर लादणे चुकीचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

नविन माहिती सोशल मिडियावर आलेली आहे. परंतु हा विषय तक्रारीचा होणार आहे. पाणीपट्टी कपात करण्यावरून अनेकदा भांडणांचा विषय कारखान्यांशी शेतकऱ्यांशी झालेला आहे. वीज बिलाबाबत अनेक तक्रारी आहेत. वीजकंपनी वसुलीचे पैसे घेवून रिकामे होईल मात्र कारखान्यांशी वादाचा विषय होवू शकतो. वसुलीबाबत फेरविचार करणे गरजेचे आहे. वसुलीचा विषय अडचणीचा होणार आहे, त्याला कारखान्यांवर वसुली लादणे बरोबर नाही. ऊस बिलातून वीज बिलाची वसुलीचा निर्णय करणार असतील करू नये असे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.