पुण्यात तरुणांची हातात कोयते घेऊन फिल्मी स्टाईल दहशत

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. हि घटना विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळस गावठाणमध्ये रात्री 11 च्या सुमारास घडली आहे. यामध्ये सुमारे 15 ते 20 जणांच्या टोळीने 2 दुचाकी आणि 4 रिक्षांची कोयत्याच्या साहाय्याने तोडतोड केली आहे. या आरोपी तरुणांनी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. हि घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

याप्रकरणी 15 ते 20 जणांविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळस परिसरात दोन गटात वाद झाल्यानंतर, तरुणांच्या टोळक्याने हातात तलवारी, कोयते आणि अन्य हत्यारे घेत परिसरात दहशत निर्माण केली. यानंतर आरोपींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या फोडत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी तरुण हातात प्राणघातक हत्यारे घेऊन धावताना दिसत आहेत. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर, गोंधळ घालणाऱ्या दोन्ही गटातील संशयितांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच धानोरी परिसरातील मुंजाबा वस्ती येथे आठ ते दहा जणांच्या टोळीनं हातात कोयते, तलवारी, दांडके घेऊन अशाच प्रकारचा धिंगाणा घातला होता. यावेळी आरोपींकडून रस्त्यांवरील दुकानं आणि पान टपऱ्यांची तोडफोड करण्यात आली होती.