गांधीजींनी आत्महत्या कशी केली? गुजरातमधील शाळेने परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाने खळबळ

विशेष प्रतिनिधी । महात्मा गांधी यांनी आत्महत्या कशी केली, असा प्रश्न नववीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत विचारून गुजरातमधील एका शाळेने खळबळ उडवली असून गुजरातच्या शिक्षण विभागाने या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. आणखी एका अशाच प्रश्नामुळे गुजरातच्या शिक्षण अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. गुजरात राज्यात दारुबंदी असताना दारू गाळण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. गांधीजींनी आत्महत्या कशी केली, असा प्रश्न गांधीनगरमधील सुफलम शाळा विकास संकुलातर्फे चालवल्या जाणाऱ्या एका खासगी शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन परीक्षेत विचारण्यात आला होता. या प्रश्नाने शिक्षण अधिकाऱ्यांची झोप उडवली आहे.

सुफलम शाळा विकास संकुल ही संस्था काही शाळा आणि शैक्षणिक संस्था चालवते. या संस्थेला गुजरात सरकार अनुदानही देते. शाळेतील शिक्षकांनी विचारलेल्या या विचित्र प्रश्नप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन्ही प्रश्न अतिशय आक्षेपार्ह असून या प्रकाराची आम्ही चौकशी सुरू केली आहे. अहवाल येताच दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे गांधीनगर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी भारत वधेर यांनी सांगितले.

दरम्यान बारावीच्या प्रश्न पत्रिकेतही आश्चर्यचकीत करणारा प्रश्न विचारण्यात आला होता. तुमच्या विभागात होणारी दारूविक्री आणि दारू गाळणाऱ्यांमुळे होणारा उपद्रव याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र लिहिण्याविषयीच्या या प्रश्नाने सर्वाना अचंबित केले आहे. वास्तविक गुजरात राज्यात दारूबंदी असतानाही हा प्रश्न विचारण्यात आल्याने या प्रकाराचीही चौकशी होणार आहे.

इतर काही बातम्या-