पाककला |
लागणारे साहित्य :-
सारणासाठी, दीड कप शेंगदाणे, दीड कप खसखस दीड कप तेल, दीड किलो गूळ, एक कप बेसन, दोन सुक्या नारळाच्या वाट्या, ३/४ कप पांढरे तिळ, दिड कप मैदा, ३/४ कप कणिक, दोन टेस्पून तेल, चिमूटभर मिठ, दोन टेस्पून बेसन.
कृती :-
चवीला छान आणि सुंदर अशी गुळपोळी बनवण्यासाठी स्टेप बाय स्टेप कृती करा.
◆नारळाच्या वाट्या किसून घ्याव्यात. सोनेरी रंग येईपर्यंत कोरडेच भाजावे. हाताने चुरून घ्यावे. हा चुरा आपल्याला १/२ ते ३/४ कप हवा आहे.
◆ शेंगदाणे भाजून त्याची साले बाजूला करावीत आणि बारीक कूट करून घ्यावा.
◆ तिळ व खसखस स्वतंत्र, कोरडेच भाजून घ्यावे. बारीक पूड करून घ्यावी
◆ एका मध्यम पण जाड बुडाच्या पातेल्यात दीड कप तेल गरम करावे. त्यात एक कप बेसन खमंग भाजून घ्यावे.
◆ गूळ बारीक किसणीवर किसून घ्यावा. सर्व भाजलेल्या गोष्टी तिळ, खसखस, शेंगदाणे, बेसन, सुकं खोबरं गूळामध्ये घालून मळून घ्यावे आणि घट्ट गोळा करावा.
◆ मैदा, कणिक, मिठ आणि बेसन एकत्र करावे. दोन टेस्पून तेल कडकडीत गरम करून पिठात घालावे. पाणी घालून मध्यमसर घट्ट गोळा भिजवावा. लागल्यास थोडे साधे तेल घालावे. १५ मिनीटे झाकून ठेवावे.
◆ सारणाचे २३ ते २५ सारख्या आकाराचे गोळे करून घ्यावे.
◆ आवरणासाठी आपल्याला ‘एक सारण गोळ्याला दोन पिठाचे गोळे’ हवे आहेत त्यानुसार सारणाच्या गोळ्यापेक्षा जरा लहान असा पिठाचा गोळा करावा.
◆ दोन पिठाच्या लाट्यामध्ये एक सारणाचा गोळा भरून लाटीच्या कडा सिल करून बंद करावा. हाताने हलके दाबून थोड्या कोरड्या पिठावर पोळी लाटावी. गुळाची पोळी एका बाजूनेच लाटावी, बाजू पलटू नये.
◆ मध्यम तवा तापवून दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्याव्यात. कागदावर काढून किंचीत गार होवू द्याव्यात. एकदम गरम खावू नये, सारणातील गूळ गरम असल्याने चटका बसू शकतो.
गुळपोळी गार किंवा कोमट दोन्हीप्रकारे छान लागते. गुळपोळीवर नेहमी थोडे तूप घालून खावे म्हणजे उष्ण पडत नाही.
फायदे :-
गुळपोळीतून भरपूर कॅलरीज मिळतात. कमी खाल्ले तरी शक्ती भरपूर मिळते. प्रतिकारशक्ती वाढते. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत होते. अशक्तपणा कमी होतो. थंडीत खायला मजा येते. आरोग्याला लाभदायक असते.