नगरसेवकाकडून बीड जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये रजिस्ट्री ऑफिसमध्ये एका नगरसेवकाने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने दोघांना काठीने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्यावर गोळीबारसुद्धा केला आहे. या गोळीबारात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

काय आहे नेमके प्रकरण ?
आज सकाळी अकराच्या सुमारास बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील रजिस्ट्री ऑफिसमध्ये काही जणांमध्ये जमिनीवरून वाद सुरु होता. या ठिकाणी मोठ्या आवाजात बाचाबाची सुरू असल्याने अनेक आसपासच्या नागरिकांनी याठिकाणी गर्दी केली. यानंतर हा वाद एवढा विकोपाला गेला कि बीडमधील एका नगरसेवकाने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने दोन जणांना काठी आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

यादरम्यान आजूबाजूच्या नागरिकांनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण संतापलेल्या नगरसेवकाने आणि त्यांच्या साथीदारांनी सतीश क्षीरसागर आणि फारुक सिद्दीकी या दोघांवर गोळीबार केला. यामध्ये सतीश क्षीरसागर यांच्या पायाला गोळी लागली असून खोलवर जखम झाली आहे. तर फारुक सिद्दीकी यांच्या पायाला गोळी चाटून गेली असून तेही या घटनेत जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर दोन्ही जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. बीड पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment