मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील धारावी परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दबा धरून बसलेल्या दोन आरोपींनी एका तरुणावर अंदाधुंद गोळीबार केला. ज्या तरुणावर हा हल्ला करण्यात आला त्याला चार गोळ्या लागल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे. या जखमी तरुणाला उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धारावी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. हा हल्ला करणाऱ्या दोन्ही मारेकऱ्यांची ओळख पटवण्यात आली असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तरुणाचे नाव आमिर आहे. तो धारावी परिसरातील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी हा तरुण नैसर्गिक विधीसाठी पिला बंगलो परिसरालगत असणाऱ्या मोकळ्या मैदानात गेला होता. नैसर्गिक विधी उरकल्यानंतर तो परत आपल्या घराच्या दिशेनं येत होता. यावेळी दबा धरून बसलेल्या दोन जणांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. आपल्या अचानक हल्ला झाल्याचे समजताच आमिरने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी टॅक्सीच्या दिशेनं पळ काढला. पण आरोपींनी पाठलाग करत त्याच्यावर गोळ्या झाडल्या.
या हल्ल्यामध्ये आमिरला चार गोळ्या लागल्या आहेत. घडलेल्या प्रकार जखमी आमिरच्या एका मित्राने पाहिल्यानंतर त्याने आमिरला उपचारासाठी तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले. हल्ला झालेला तरुण आणि आरोपी हे सगळे गुन्हेगारी प्रवृतीचे तरुण आहेत. हा हल्ला ड्रग्स तस्करीच्या वादातून झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. मात्र पोलिसांनी याला कोणत्याही प्रकारचा दुजोरा दिलेला नाही. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीं विरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.